'अवतार ३' मध्ये खरोखरच गोविंदाचा कॅमिओ? फोटो झाले व्हायरल; जाणून घ्या सत्य!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 11:54 IST2025-12-21T11:47:15+5:302025-12-21T11:54:55+5:30
'अवतार: फायर अँड ॲश'मध्ये गोविंदाचा कॅमिओ? सोशल मीडियावर फोटो व्हायरल

'अवतार ३' मध्ये खरोखरच गोविंदाचा कॅमिओ? फोटो झाले व्हायरल; जाणून घ्या सत्य!
हॉलिवूड दिग्दर्शक जेम्स कॅमेरॉन यांचा 'अवतार: फायर अँड ॲश' हा चित्रपट सध्या जगभरातील चित्रपटगृहात धुमाकूळ घालत आहे. मात्र, भारतात या चित्रपटाची चर्चा एका वेगळ्याच कारणाने रंगली आहे. सोशल मीडियावर सध्या काही फोटो तुफान व्हायरल होत आहेत. ज्यात बॉलिवूडचा 'हिरो नंबर १' म्हणजेच अभिनेता गोविंदानं 'अवतार: फायर अँड ॲश'मध्ये कॅमिओ केल्याचा दावा केला जात आहे.
गोविंदा याने मागील काही मुलाखतींमध्ये हॉलिवूडचा सुपरहिट सिनेमा 'अवतार' याबाबत मोठे दावे केले होते. गोविंदाच्या म्हणण्यानुसार, दिग्दर्शक जेम्स कॅमेरॉन यांनी त्याला या चित्रपटासाठी ऑफर दिली होती. मात्र, कलाकारांच्या शरीरावर पेंट करण्याची अट असल्याने आपण हा सिनेमा नाकारल्याचा दावा गोविंदाने केला होता.
दरम्यान, आता सोशल मीडियावर एक फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये गोविंदा 'अवतार: फायर अँड ऍश'मध्ये दिसत असल्याचा दावा केला जात आहे. काही X युजर्सनी हा फोटो शेअर करत गोविंदाने या चित्रपटात कॅमिओ केल्याचे म्हटले आहे. मात्र, हे सत्य नसून, गोविंदाचा या चित्रपटात कोणताही कॅमिओ नाही. गोविंदाचे हे फोटो एआय AI द्वारे तयार करण्यात आले असावेत किंवा फोटोशॉप वापरून गोविंदाचा चेहरा 'नावी' पात्रावर बसवण्यात आला.
— Out of Context Indian Cinema (@OutofConCinema) December 20, 2025
नेटकऱ्यांच्या मजेशीर प्रतिक्रिया
गोविंदाने यापूर्वी अनेक मुलाखतींमध्ये 'अवतार' बाबत केलेल्या दाव्यांमुळे नेटकऱ्यांनी या फोटोंवर भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने लिहिले, "अखेर गोविंदाने जेम्स कॅमेरॉनला होकार दिलाच!" दुसऱ्याने उपरोधिकपणे म्हटले, "स्पॉयलर अलर्ट: गोविंदाने 'अवतार ३' मध्ये कॅमिओ करून आपल्या कारकिर्दीतील सर्वात मोठे पुनरागमन केले आहे". तर एकाने गमतीत विचारले, "जेम्स कॅमेरॉनने गोविंदाला मनवलं कसं?".