गोविंदाला होती हॉलिवूडच्या 'अवतार'ची ऑफर, मिळणार होते १८ कोटी, म्हणाला- "जेम्स कॅमरुनला भेटल्यावर..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 13:15 IST2025-03-13T13:15:18+5:302025-03-13T13:15:58+5:30
वतार सिनेमात जेम्स कॅमरुन यांनी मुख्य भूमिकेची ऑफर दिली होती. यासाठी गोविंदाला १८ कोटी रुपयाचं मानधन मिळणार होतं. याशिवाय सिनेमाचं नावही अभिनेत्यानेच सजेस्ट केल्याचा खुलासाही गोविंदाने केला.

गोविंदाला होती हॉलिवूडच्या 'अवतार'ची ऑफर, मिळणार होते १८ कोटी, म्हणाला- "जेम्स कॅमरुनला भेटल्यावर..."
अभिनय आणि स्पेशल डान्स स्टाइलने बॉलिवूडचं ८०-९०चं दशक गाजवणारा अभिनेता गोविंदा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या पर्सनल आयुष्यामुळे चर्चेत आहे. गोविंदाचा स्टारडम मोठा आहे. आणि चाहत्यांना आपल्या या आवडत्या कलाकाराबद्दल जाणून घ्यायला नेहमीच आवडतं. बॉलिवूड गाजवणाऱ्या गोविंदाला हॉलिवूडच्या अवतार सिनेमाचीही ऑफर होती. पण, अभिनेत्याने ही ऑफर नाकारली. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत याबाबत गोविंदाने खुलासा केला आहे.
गोविंदाने नुकतीच मुकेश खन्ना यांच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. या मुलाखतीत अवतार सिनेमाची ऑफर असल्याचा खुलासा अभिनेत्याने केला. अवतार सिनेमात जेम्स कॅमरुन यांनी मुख्य भूमिकेची ऑफर दिली होती. यासाठी गोविंदाला १८ कोटी रुपयाचं मानधन मिळणार होतं. याशिवाय सिनेमाचं नावही अभिनेत्यानेच सजेस्ट केल्याचा खुलासाही गोविंदाने केला.
तो म्हणाला, "मी २१.५ कोटींची ऑफर सोडली आणि हे मला चांगलं लक्षात आहे कारण ते फारच कठीण होतं. मी अमेरिकेत एका सरदारजीला भेटलो होतो. त्यांना मी एक बिजनेस आयडिया दिली होती ज्यामुळे त्यांना फायदा झाला होता. काही वर्षांनंतर त्यांनी माझी जेम्स कॅमेरुनशी भेट घडवून दिली. जेम्स कॅमरुन यांनी मला डिनरसाठी बोलवलं होतं. मी सिनेमाचं नाव सुचवलं - अवतार. जेम्स यांनी मला सांगितलं सिनेमाचा हिरो दिव्यांग आहे. त्यामुळे मी या सिनेमासाठी नकार दिला. त्यांनी मला १८ कोटी रुपये मानधन मिळेल असं सांगितलं होतं. ४१० दिवस शूटिंगसाठी लागणार होते. मी त्यांना हो म्हणालो. पण मी एक अट घातली होती की जर माझ्या शरीरावर रंग लागणार आहे. तर मग मी हॉस्पिटलमध्ये राहीन".
"आपलं शरीर हे फार महत्त्वाचं आहे. काही वेळेस काही गोष्टी तुमच्या प्रोफेशनसाठी चांगल्या वाटतात. पण, त्याचा शरीरावर काय परिणाम होईल याचा विचारही करावा लागतो. काही वेळेस एका सिनेमाला नकार दिल्यानंतर तुम्हाला अनेक दिवस चाहत्यांची माफी मागावी लागते", असंही गोविंदाने सांगितलं.