सुखकर्ता दुःखहर्ता... सलमान खानने मनोभावे केली गणपतीची आरती, रितेश-जिनिलियाचीही हजेरी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 12:47 IST2025-08-28T12:45:49+5:302025-08-28T12:47:10+5:30
अभिनेता सलमान खानच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे.

सुखकर्ता दुःखहर्ता... सलमान खानने मनोभावे केली गणपतीची आरती, रितेश-जिनिलियाचीही हजेरी!
गणेश चतुर्थीनिमित्त (Ganesh Chaturthi) भाविकांनी घराघरांमध्ये बाप्पाची प्रतिष्ठापना केली. विविध मंडळांसह घरोघरी बाप्पाची मनोभावे पूजा केली जात आहे. बॉलिवूड सेलिब्रिटी त्यांच्या घरी गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना करतात. मोठ्या धूमधडाक्यात बाप्पाला घरी आणले जाते आणि साश्रू नयनांनी निरोप दिला जातो. अभिनेता सलमान खान गणपती बाप्पाचा केवढा मोठा भक्त आहे हे सगळ्यांनाच माहित आहे. त्यामुळे सलमान आणि त्याचं कुटुंब मागील गेल्या काही वर्षांपासून गणेश उत्सव दणक्यात साजरा करतं. यंदाही सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये गणरायाचं आगमन झालं आहे.
सलमानने स्वतः इन्स्टाग्रामवर घरी झालेल्या गणेशाच्या आरतीचा एक सुंदर व्हिडीओ शेअर केला आहे, जो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये सुरुवातीला सलमानचे वडील सलीम खान आणि आई सलमा खान मनोभावे गणपतीची आरती करताना दिसतात. त्यानंतर सलमान स्वतः आणि त्याचे भाऊ-बहीण आणि कुटुंबातील इतर सदस्य आरती करतात. यावेळी बॉलिवूडमधील जोडपे रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख त्यांच्या मुलांसोबत या उत्सवात सहभागी झाले होते.
सलमान खान हा त्याच्या कुटुंबासोबत दरवर्षी गणेश चतुर्थी साजरी करतो. यावर्षीही त्याचं संपूर्ण कुटुंब आणि काही जवळचे मित्रमंडळी गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी एकत्र आले. सलमानच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास, सलमान खानचा 'सिकंदर' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा चालला नाही. आता तो 'बॅटल ऑफ गलवान' या चित्रपटाच्या तयारीमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट २०२० साली भारत आणि चीन यांच्यात झालेल्या गलवान खोऱ्यातील संघर्षावर आधारित आहे. या चित्रपटात सलमान कर्नल संतोष बाबू यांची भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे.