"दिवंगत अभिनेते सतीश शाह यांना मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार द्यावा", FWICE ची पंतप्रधानांना विनंती
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 09:45 IST2025-10-29T09:44:23+5:302025-10-29T09:45:50+5:30
FWICE ने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक औपचारिक पत्र लिहिले आहे.

"दिवंगत अभिनेते सतीश शाह यांना मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार द्यावा", FWICE ची पंतप्रधानांना विनंती
प्रसिद्ध अभिनेते सतीश शाह यांचं निधन झालं आहे. ते ७४ वर्षांचे होते. समोर आलेल्या वृत्तानुसार, किडनी फेल्युअरमुळे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे. अनेक नामांकित कलाकार आणि चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज (FWICE) ने भारतीय सतीश शाह यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल त्यांना मरणोत्तर पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्याची शिफारस केली आहे. या संदर्भात FWICE ने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक औपचारिक पत्र लिहिले आहे.
FWICE ही भारतीय चित्रपट, टेलिव्हिजन आणि डिजिटल उद्योगातील ३६ संघटना आणि एका मोठ्या कार्यशक्तीचे प्रतिनिधित्व करणारी शिखर संस्था आहे. या संघटनेने पत्रात स्पष्ट केले आहे की, "दिवंगत सतीश शाह हे एक अत्यंत प्रतिभावान कलाकार होते, ज्यांच्या कामाने आपल्या देशातील लाखो लोकांची मने जिंकली".
FWICE ने पत्रात केवळ त्यांच्या अभिनयाचाच नव्हे तर त्यांच्या दयाळू आणि उदार व्यक्तिमत्त्वाचाही उल्लेख केला आहे. पत्रात म्हटले आहे की, अभिनयाव्यतिरिक्त, सतीश शाह एक दयाळू आणि सहानुभूती असलेले व्यक्ती होते. त्यांनी नेहमीच सहकारी कलाकार, तंत्रज्ञ आणि संपूर्ण बंधुत्वाला प्रोत्साहन दिले. सतीश शाह यांनी FWICE च्या अनेक कल्याणकारी उपक्रमांना उदारपणे आणि मोठ्या मनाने पाठिंबाही दिला होता. FWICE ने पंतप्रधानांना नम्र विनंती केली आहे की, हा सन्मान केवळ एका अभिनेत्याचा नाही, तर चार दशकांहून अधिक काळ भारतीय प्रेक्षकांना हसवणाऱ्या व्यक्तीचा गौरव आहे.