लेकाने सांगितलं म्हणून भारत दौऱ्यापूर्वी फिनलँडच्या राष्ट्रपतींनी पाहिला 'धुरंधर', म्हणाले- "१९ मार्चला मी..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2026 12:39 IST2026-03-08T12:35:26+5:302026-03-08T12:39:59+5:30
'धुरंधर' चित्रपटाची जादू आता सातासमुद्रापार पोहोचली आहे. भारत दौऱ्यावर असलेल्या अलेक्झांडर स्टब यांनी नुकतंच अभिनेता रणवीर सिंगचा गाजलेला चित्रपट 'धुरंधर' पाहिल्याचा खुलासा केला आहे

लेकाने सांगितलं म्हणून भारत दौऱ्यापूर्वी फिनलँडच्या राष्ट्रपतींनी पाहिला 'धुरंधर', म्हणाले- "१९ मार्चला मी..."
'धुरंधर' चित्रपटाची जादू आता सातासमुद्रापार पोहोचली असून, फिनलँडचे राष्ट्रपती अलेक्झांडर स्टब (Alexander Stubb) हे देखील बॉलिवूडचे चाहते झाले आहेत. भारत दौऱ्यावर असलेल्या अलेक्झांडर स्टब यांनी नुकतंच अभिनेता रणवीर सिंगचा गाजलेला चित्रपट 'धुरंधर' पाहिल्याचा खुलासा केला आहे. केवळ चित्रपट पाहिलाच नाही, तर त्यांनी या चित्रपटाच्या विषयाचे कौतुक करत आगामी सीक्वलबाबत मोठी उत्सुकता व्यक्त केली आहे.
मुलाच्या सांगण्यावरून पाहिला चित्रपट
अलेक्झांडर स्टब ४ ते ७ मार्च २०२६ दरम्यान भारताच्या अधिकृत दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेतली. एका मुलाखतीदरम्यान त्यांनी सांगितले की, "इंटरेस्टिंग गोष्ट अशी की, मी भारत दौऱ्यावर येण्यापूर्वी माझ्या मुलाने मला 'धुरंधर' चित्रपट पाहण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार मी तो चित्रपट पाहिला आणि मला तो खूप आवडला."
राष्ट्रपती स्टब यांनी चित्रपटातील कथेचे विशेष कौतुक केले. ते म्हणाले की, "या चित्रपटात दहशतवादाविरुद्धचा लढा ज्या पद्धतीने मांडला आहे, ते पाहून मला आनंद झाला. मी स्वतः दहशतवादाविरुद्धच्या भूमिकेचे समर्थन करतो." या चित्रपटामुळे भारतीय गुप्तचर यंत्रणा आणि त्यांच्या धाडसी मोहिमांबद्दलची त्यांना जास्त माहिती कळाली असंही त्यांनी नमूद केले.
'धुरंधर २' ची प्रतीक्षा
सध्या सोशल मीडियावर 'धुरंधर'चा सीक्वल म्हणजेच 'धुरंधर: द रिव्हेंज' (Dhurandhar 2) चा ट्रेलर धुमाकूळ घालत आहे. यावर भाष्य करताना फिनलँडच्या राष्ट्रपतींनी सांगितले की, ''१९ मार्च रोजी या चित्रपटाचा जो सीक्वल येतोय त्याचीही आतुरतेने वाट पाहत आहे.'' आदित्य धर दिग्दर्शित या चित्रपटात रणवीर सिंग पुन्हा एकदा हमजा अलीची तगडी भूमिका साकारताना दिसणार आहे. त्यामुळे केवळ भारतीयच नाही तर फिनलँडचे राष्ट्रपतीही सिनेमाबद्दल उत्सुक आहेत, ही सर्वांसाठी मोठी गोष्ट आहे.
या चित्रपटाच्या दुसऱ्या भागात रणवीर सिंगसोबत संजय दत्त, आर. माधवन आणि अर्जुन रामपाल यांसारखे दिग्गज कलाकार महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसणार आहेत. याशिवाय इमरान हाश्मी, यामी गौतम, विकी कौशल यांचा कॅमिओ रोल असल्याहीची चर्चा आहे.