'या' व्यक्तीशी अजय देवगण गेल्या १८ वर्षांपासून बोलत नाही, कारण काय? वाचा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 15:36 IST2025-10-14T15:20:49+5:302025-10-14T15:36:43+5:30
१८ वर्षांपासून 'या' व्यक्तीशी अजय देवगणनं का धरलाय अबोला

'या' व्यक्तीशी अजय देवगण गेल्या १८ वर्षांपासून बोलत नाही, कारण काय? वाचा...
बॉलिवूडचा 'सिंघम' अर्थात अभिनेता अजय देवगणचा स्वभाव शांत, संयमी आणि नम्र मानला जातो. तो पडद्यावर ॲक्शन हिरोच्या भूमिका साकारतो, पण प्रत्यक्षात तो शांत स्वभावामुळे ओळखला जातो. अशातच मात्र, अजय देवगणबद्दल एक मोठी गोष्ट समोर आली आहे. चित्रपटसृष्टीत एक अशी व्यक्ती आहे, ज्याच्यासोबत अजय देवगण गेल्या तब्बल १८ वर्षांपासून बोलत नाहीये. दोघांमध्ये इतका मोठा वाद कशावरून झाला आणि कोण आहे ती व्यक्ती, हे जाणून घेऊया.
ती व्यक्ती आहे अनुभव सिन्हा. अनुभव सिन्हा यांना Ra.One, मुल्क आणि Article 15 सारख्या दमदार चित्रपटांसाठी ओळखलं जातं. मात्र, त्यांनी काही असे चित्रपटही केले आहेत, ज्याबद्दल त्यांना आजही खेद वाटतो. अनुभव यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या करिअरमधील सर्वात वाईट चित्रपट त्यांनी अजय देवगणसोबत केला होता. २००७ मध्ये आलेला 'कॅश' हा चित्रपट इतका मोठा फ्लॉप ठरला की अजय आणि अनुभव यांचं बोलणंही बंद झालं.
यूट्यूब चॅनल 'उल्टा चश्मा UC' ला दिलेल्या मुलाखतीत अनुभव सिन्हा म्हणाले की, "'कॅश' फ्लॉप झाल्यानं अजय आणि माझ्या नात्यावर परिणाम झाला. त्यानंतर आम्ही पुन्हा कधी भेटलोच नाही. अजय देवगण खूप चांगला व्यक्ती आहे.पण कधी-कधी जेव्हा चित्रपट चालत नाहीत, तेव्हा टीम वेगळी होते. माझ्या करिअरमधला सर्वात खराब चित्रपट मी त्यांच्या सोबत केला. कॅश ही अतिशय वाईट फिल्म होती आणि टीम मेंबर्सना त्यावर नाराजी व्यक्त करण्याचा पूर्ण अधिकार आहे. ती एक गैरजबाबदार फिल्म होती. त्या चित्रपटानंतर अजय आणि मी वेगळे झालो".
अनुभव पुढे म्हणाले, "आमच्यात कधी भांडण झालं नाही, फक्त त्यानं माझ्याशी बोलणं बंद केलं. मला त्याचं कारण माहीत नाही. 'कॅश'नंतर आम्ही कधी भेटलोच नाही, त्यामुळे तो मला का टाळतोय, हे विचारण्याची कधी संधीच मिळाली नाही. कदाचित मीच जास्त विचार करतोय. मी त्याला अनेक वेळा मेसेज केले, पण त्याच्याकडून कधी उत्तर आलं नाही. मग मी स्वतःला समजावलं की कदाचित त्याला माझे मेसेज मिळाले नसावेत. पण आता १८ वर्षं झाली आणि आम्ही आजपर्यंत बोललेलो नाही".
दरम्यान, 'कॅश' या चित्रपटात अजय देवगण व्यतिरिक्त सुनील शेट्टी, ईशा देओल, रितेश देशमुख, जायेद खान, शमिता शेट्टी, आयेशा टाकिया आणि दिया मिर्झा यांसारखे कलाकार होते. अनुभव सिन्हा यांनी या चित्रपटाचं बहुतांश शूटिंग केपटाउन (दक्षिण आफ्रिका) येथे केलं होतं. पण, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारच खराबरीत्या अपयशी ठरला होता.