पाकिस्तानातही 'धुरंधर'ची क्रेझ, रणवीर सिंगच्या गाण्यावर लग्नात वऱ्हाडींचा तुफान डान्स, व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 16:53 IST2025-12-11T16:52:42+5:302025-12-11T16:53:20+5:30
पाकिस्तानातील एका लग्नातील हा व्हिडीओ असल्याचं म्हटलं जात आहे. या व्हिडीओत लग्नातील वऱ्हाडी चक्क रणवीर सिंगच्या 'धुरंधर' सिनेमातील गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.

पाकिस्तानातही 'धुरंधर'ची क्रेझ, रणवीर सिंगच्या गाण्यावर लग्नात वऱ्हाडींचा तुफान डान्स, व्हिडीओ व्हायरल
रणवीर सिंगच्या 'धुरंधर' सिनेमाने सगळ्यांनाच वेड लावलं आहे. जिकडेतिकडे फक्त 'धुरंधर' या बॉलिवूड सिनेमाची चर्चा होताना दिसत आहे. ट्रेलरपासूनच या सिनेमाच्या प्रतिक्षेत प्रेक्षक होते. अखेर ५ डिसेंबरला 'धुरंधर' सर्वत्र प्रदर्शित झाला. 'धुरंधर' सिनेमातील गाण्यांनाही प्रेक्षकांकडून पसंती मिळाली आहे. सोशल मीडियावर सिनेमातील गाण्याचे अनेक रील व्हिडीओ व्हायरल होत आहेत. 'धुरंधर'ची क्रेझ केवळ भारतातच नव्हे तर पाकिस्तानातही पाहायला मिळत आहे.
सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतो आहे. पाकिस्तानातील एका लग्नातील हा व्हिडीओ असल्याचं म्हटलं जात आहे. या व्हिडीओत लग्नातील वऱ्हाडी चक्क रणवीर सिंगच्या 'धुरंधर' सिनेमातील गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. सूट बूट घातलेली ४ मुलं 'धुरंधर'च्या टायटल ट्रॅकवर डान्स करत असल्याचं व्हिडीओत पाहायला मिळत आहे. या व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सोशल मीडियावर या व्हिडीओची प्रचंड चर्चाही होत आहे.
'धुरंधर' हा सिनेमा पाकिस्तानात जाऊन राहिलेल्या भारतीय गुप्तहेरांच्या कारवायांवर आधारित आहे. या सिनेमातून पाकिस्तानातील राजकारण, गँगवॉर, २६/११ यांसारख्या अनेक विषयांवर भाष्य करण्यात आलं आहे. पाकिस्तानच्या कुरघोड्यांची भारतापर्यंत माहिती पोहोचवणाऱ्या गुप्तहेरावर आधारित हा सिनेमा आहे. त्यामुळेच या सिनेमातील गाण्यावर पाकिस्तानातील लग्नात डान्स होत असल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. अनेकांनी या व्हिडीओवर कमेंट करत 'धुरंधर'मधल्या गाण्यावर डान्स करणाऱ्यांना ट्रोल केलं आहे.
रणवीर सिंग, आर माधवन, अर्जुन रामपाल, सारा अर्जुन, अक्षय खन्ना अशी 'धुरंधर'ची स्टारकास्ट आहे. आदित्य धरने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. बॉक्स ऑफिसवर 'धुरंधर'ने धुमाकूळ घातला आहे. सहा दिवसांता या सिनेमाने १८० कोटींचा गल्ला जमवला आहे.