"माझ्या सिनेमातले बोल्ड सीन्स लागताच...", इमरान हाशमीने सांगितली कुटुंबीयांची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2024 15:15 IST2024-07-16T15:14:41+5:302024-07-16T15:15:36+5:30
सिनेमातील इमरानचे बोल्ड सीन्स बघताना त्यांच्या कुटुंबीयांची काय प्रतिक्रिया असते, याबाबत पहिल्यांदाच अभिनेत्याने भाष्य केलं आहे.

"माझ्या सिनेमातले बोल्ड सीन्स लागताच...", इमरान हाशमीने सांगितली कुटुंबीयांची प्रतिक्रिया
बॉलिवूडचा सिरियल किसर अशी ओळख मिळवलेला अभिनेता म्हणजे इमरान हाशमी. अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम करून इमरानने बॉलिवूडमध्ये त्याचं बस्तान बसवलं. कधी अॅक्शन करताना तर कधी रोमँटिक भूमिकेत तो दिसला. पण, इमरान त्याच्या संपूर्ण करिअरमध्ये सिनेमातील इंटिमेट सीन्समुळेच जास्त चर्चेत राहिला. 'मर्डर'सिनेमात बोल्ड सीन्स देऊन प्रसिद्धीझोतात आलेल्या इमरानने नंतर 'जन्नत', 'आशिक बनाया आपने', 'राज ३', 'जहर', 'गँगस्टर : अ लव्ह स्टोरी' अशा सिनेमांमध्ये काम केलं.
इमरानचा सिनेमा म्हटलं की बोल्डनेस आणि इंटिमेट सीन्स असणारच हे जणू समीकरणच बनलेलं आहे. पण, सिनेमातील इमरानचे हे बोल्ड सीन्स बघताना त्यांच्या कुटुंबीयांची काय प्रतिक्रिया असते, याबाबत पहिल्यांदाच अभिनेत्याने भाष्य केलं आहे. इमरानने नुकतीच एबीपी न्यूजला मुलाखत दिली. यामध्ये त्याला "तुझे सिनेमे हे कोणत्याच घरात एकत्र बसून पाहण्यासारखे नसायचे. मग हे सिनेमे तुझ्या घरात पाहिले जायचे का?" असा प्रश्न विचारण्यात आला. याचं उत्तर देताना त्याने पहिल्यांदाच यावर भाष्य केल्याचं पाहायला मिळालं.
"जेव्हा सिनेमात बोल्ड सीन्स लागायचे तेव्हा आम्ही ते फॉरवर्ड करायचो. त्यावेळी व्हीएचएस असायचा. माझ्या लहानपणी म्हणजे जेव्हा मी शाळेत होतो. तेव्हा इंग्लिश सिनेमात असे सीन्स असायचे. तेव्हा तो सीन फॉरवर्ड केला जायचा किंवा मग तो सिनेमा पाहणंच बंद केलं जायचं. आणि मला खोलीतून बाहेर जायला सांगितलं जायचं", असं इमारानने सांगितलं.
दरम्यान, सध्या इमरान त्याच्या 'शोटाईम' वेब सीरिजच्या दुसऱ्या सीझनमुळे चर्चेत आहे. अलिकडेच या सीरिजचा दुसरा सीझन प्रदर्शित झाला आहे. या वेब सीरिजचा पहिला सीझन ८ मार्चला प्रदर्शित झाला होता. डिस्ने प्लस हॉटस्टारवरील या सीरीजला प्रेक्षकांचं प्रेम मिळालं. या सीरिजमध्ये इमरान हाशमी, मौनी रॉय, महिमा मखवाना, श्रीया सरन, राजीव खंडेलवाल यांच्या मुख्य भूमिका होत्या.