Emergency Trailer: 'मीच कॅबिनेट आहे..!' राष्ट्रपतींना ठणकावून सांगणाऱ्या इंदिरा गांधींच्या भूमिकेत कंगना राणौतने वेधलं लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 11:27 IST2025-01-06T11:27:01+5:302025-01-06T11:27:54+5:30
कंगना रणौतच्या आगामी 'इमर्जन्सी' सिनेमाचा फायनल ट्रेलर रिलीज झाला असून कंगनाच्या भूमिकेने सर्वांचं लक्ष वेधलंय (kangana ranaut, emergency)

Emergency Trailer: 'मीच कॅबिनेट आहे..!' राष्ट्रपतींना ठणकावून सांगणाऱ्या इंदिरा गांधींच्या भूमिकेत कंगना राणौतने वेधलं लक्ष
अभिनेत्री कंगना राणौतच्या आगामी 'इमर्जन्सी' (Emergency) सिनेमाची सर्वांना चांगलीच उत्सुकता आहे. या सिनेमाची घोषणा काही वर्षांपूर्वी झाली. इतकंच नव्हे हा सिनेमा गेल्या वर्षी २०२४ मध्ये रिलीज होणार होता. परंतु सिनेमाविषयी वाद कोर्टात गेल्याने सिनेमाचं प्रदर्शन थांबलं. त्यामुळे दोन वेळा सिनेमाची रिलीज डेटही बदलण्यात आली. अखेर कोर्टाने सिनेमाला हिरवा कंदील दिला आणि नवीन वर्षात २०२५ मध्ये सिनेमाच्या रिलीजची तारीख समोर आली. रिलीजला काहीच दिवस बाकी असताना 'इमर्जन्सी' सिनेमाचा नवीन ट्रेलर रिलीज झालाय.
'इमर्जन्सी' सिनेमाचा नवीन ट्रेलर
नुकतंच सोशल मीडियावर 'इमर्जन्सी'चा नवीन ट्रेलर रिलीज झालाय. या ट्रेलरमध्ये दिसतं की, जयप्रकाश नारायण (अनुपम खेर) जेलमधून इंदिरा गांधींना (कंगना राणौत) पत्र लिहितात. "जसं की तुम्ही बघत आहात. सध्या तुम्ही खुर्ची नाही तर एका सिंहावर स्वार आहात. या सिंहाची गर्जना संपूर्ण जगात घुमत आहे." त्यानंतर ऑफिसमध्ये इंदिरा गांधी आणि राष्ट्रपती बसलेल्या दिसतात. "आणीबाणी लावण्यासाठी संपूर्ण कॅबिनेटची परवानगी घेणं आवश्यक आहे." असं राष्ट्रपती सांगतात. तेव्हा पंतप्रधान इंदिरा गांधी त्यांना म्हणतात, "मीच कॅबिनेट आहे राष्ट्रपती जी."
कधी रिलीज होतोय इमर्जन्सी?
अशाप्रकारे पुढे आणीबाणीच्या काळात देशाला भोगाव्या लागणाऱ्या अडचणी दिसतात. शिवाय इंदिरा गांधींच्या मंत्रिमंडळात त्यावेळी काय सुरु होतं? याचीही झलक दिसते. १ मिनिटं ५० सेकंदांच्या या ट्रेलरमध्ये कलाकारांचा दमदार अभिनय दिसतो. इंदिरा गांधींच्या भूमिकेत कंगना तर अटलबिहारी वाजपेयींच्या भूमिकेत श्रेयस तळपदे, फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या भूमिकेत मिलिंद सोमण यांच्या उत्कृष्ट अभिनयाची झलक दिसते. 'इमर्जन्सी' हा सिनेमा १७ जानेवारी २०२५ ला जगभरात प्रदर्शित होत आहे. विशेष म्हणजे कंगना रणौतनेच या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.