टॉलिवूडचा फुसका बार! प्रत्येक चित्रपट ‘बाहुबली’, ‘कांतारा’ होऊ शकणार नाही 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2023 11:10 AM2023-04-30T11:10:23+5:302023-04-30T11:17:19+5:30

मागील काही वर्षांपासून दाक्षिणात्य चित्रपटांचा बोलबाला असल्याची चर्चा रंगू लागली, पण वास्तव खूप वेगळे आहे.

each and every tollywood movies cant be successfull just like kantara and bahubali | टॉलिवूडचा फुसका बार! प्रत्येक चित्रपट ‘बाहुबली’, ‘कांतारा’ होऊ शकणार नाही 

टॉलिवूडचा फुसका बार! प्रत्येक चित्रपट ‘बाहुबली’, ‘कांतारा’ होऊ शकणार नाही 

googlenewsNext

>>संजय घावरे

‘बाहुबली’ चित्रपटाने विक्रमी व्यवसाय केला आणि संपूर्ण भारतभर दक्षिणेकडील चित्रपटांचा डंका वाजू लागला. त्यामागोमाग आलेला बिग बजेट ‘केजीएफ’ आणि लो बजेट ‘कांतारा’नेही कमाल केली. ‘आरआरआर’ने थेट ऑस्करला गवसणी घातल्याने मागील काही वर्षांपासून दाक्षिणात्य चित्रपटांचा बोलबाला असल्याची चर्चा रंगू लागली, पण वास्तव खूप वेगळे आहे. साऊथच्या चित्रपटांच्या यशाच्या रेशोमध्ये हिंदी-मराठी सिनेमांपेक्षा फार अंतर नाही.

मागच्या वर्षी एकूण १०८ हिंदी चित्रपट रिलीज झाले, त्यापैकी ब्रह्मास्त्र, गंगूबाई काठियावाडी, द कश्मिर फाईल्स, भुल भुलैया २ या चित्रपटांनी चांगला व्यवसाय केला. ९० मराठी चित्रपटांपैकी वेड, धर्मवीर, पावनखिंड, मी वसंतराव, शेर शिवराज, चंद्रमुखी यांनी तिकिटबारीवर कमाई केली. दक्षिणेकडे मल्याळम १८३, कन्नड २१०, तेलुगू १८३, तमिळ २७८ असे मिळून जवळपास ८५४ चित्रपट प्रदर्शित झाले. यापैकी प्रत्येक भाषेतील पाच ते सात चित्रपट यशस्वी झाले असून, त्यांचाच उदोउदो होत आहे. असे बरेच चित्रपट मागच्या वर्षी प्रदर्शित झाले. जे प्रदर्शित झाले आणि पहिल्याच वीकेंडला सिनेमागृहांबाहेर गेले. असे चित्रपट हिंदी आणि मराठीतही पाहायला मिळते. 

शाहरुख खानच्या ‘पठाण’ ने विक्रमी व्यवसाय केला. ‘किसी का भाई किसी की जान’ने पहिल्या वीकेंडला जगभरातून १०० कोटी रुपये कमावले, पण सोमवारपासून उतरती कळा लागल्याने आता हा सिनेमा किती दिवस तग धरेल यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या आठवड्यात रिलीज झालेल्या ‘पोन्नियीन सेल्व्हन २’ चा प्रचंड गाजावाजा झाला, पण त्यालाही संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे दक्षिणेकडील प्रत्येक चित्रपट ‘बाहुबली’ नाही हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

दक्षिणेकडचे काही चित्रपट तिकडच्या चार भाषा आणि हिंदी अशा एकूण पाच भाषांमध्ये एकाच वेळी रिलीज होतात, ज्याचा फायदा त्यांना होतो. हिंदी-मराठी चित्रपटांच्या बाबतीत सांगायचे तर ‘ब्रम्हास्त्र’ आणि ‘पठाण’सारखे चित्रपट तशी मजल मारतात आणि यशस्वी होतात. ‘हर हर महादेव’ पाच भाषांमध्ये रिलीज करण्याचा प्रयत्न केला, पण वादाच्या भोवऱ्यात अडकल्याचा फटका बसला.

Web Title: each and every tollywood movies cant be successfull just like kantara and bahubali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.