घराबाहेर गोळीबार झाल्यानंतर तीन महिन्यांनी रोहित शेट्टीची पहिली पोस्ट, म्हणाला- "सध्या आयुष्यात..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2026 13:15 IST2026-04-04T13:14:36+5:302026-04-04T13:15:35+5:30
जानेवारी महिन्यात रोहित शेट्टीच्या घराबाहेर गोळीबार झाल्यानंतर त्याच्या चाहत्यांना चांगला धक्का बसला. आता या घटनेनंतर तब्बल तीन महिन्यांनी रोहित शेट्टीने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे.

घराबाहेर गोळीबार झाल्यानंतर तीन महिन्यांनी रोहित शेट्टीची पहिली पोस्ट, म्हणाला- "सध्या आयुष्यात..."
बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी याने आजवर 'सिंघम' फ्रँचायझी, 'सूर्यवंशी' आणि 'सिंबा' यांसारखे सुपरहिट अॅक्शन चित्रपट दिले आहेत. त्याचबरोबर 'गोलमाल' सीरिज, 'चेन्नई एक्सप्रेस' आणि 'बोल बच्चन' सारख्या सिनेमांतून त्याने प्रेक्षकांना खळखळून हसवले आहे. जानेवारी महिन्यात रोहित शेट्टीच्या घराबाहेर गोळीबार झाल्यानंतर त्याच्या चाहत्यांना चांगला धक्का बसला. आता या घटनेनंतर तब्बल तीन महिन्यांनी रोहित शेट्टीने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे.
रोहित शेट्टीची इन्स्टाग्राम पोस्ट
शनिवारी रोहित शेट्टीने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत तो ब्लॅक टी-शर्ट आणि काळा चष्मा लावून डॅशिंग पोझ देताना दिसत आहे. या फोटोपेक्षा त्याच्या कॅप्शनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याने लिहिले आहे की, "मी इतकी वर्षे अॅक्शन आणि कॉमेडी चित्रपट बनवण्यात घालवली. साला सध्या माझ्या आयुष्यातच अॅक्शन आणि कॉमेडी सुरू आहे."
नेटकऱ्यांच्या मजेशीर प्रतिक्रिया
रोहितच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी विविध कमेंट्स केल्या आहेत. बहुतांश चाहत्यांना 'खतरों के खिलाडी'चा पुढचा सीझन कधी येणार, हे जाणून घेण्यात रस आहे. एका युजरने लिहिले, "आयुष्याचा अर्थच अॅक्शन आणि ड्रामा आहे, त्यामुळे तुम्ही 'सिंबा' बना." दुसऱ्या एका युजरने 'गोलमाल ५' मुळे सर्व काही बदलून जाईल, असा विश्वास व्यक्त केला, तर एका चाहत्याने "काळजी करू नका, तुमचा धासू कमबॅक होणार आहे," असे म्हणत त्याला धीर दिला.
रोहित शेट्टीने ही पोस्ट अशा वेळी केली आहे जेव्हा तो वैयक्तिक आयुष्यात काही आव्हानांचा सामना करत आहे. जानेवारी महिन्याच्या अखेरीस रोहित शेट्टीच्या घराबाहेर पाच राऊंड फायरिंग झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. या प्रकरणी आतापर्यंत अनेक लोकांना अटक झाल्या असून पोलीस तपास सुरू आहे. याच घटनेसंदर्भात रोहितने ही क्रिप्टिक पोस्ट केली असल्याची चर्चा आहे.
रोहित शेट्टीच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, त्याचा पुढचा मोठा प्रोजेक्ट 'गोलमाल ५' आहे. हा चित्रपट २०२७ मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. २००६ मध्ये 'गोलमाल: फन अनलिमिटेड' पासून सुरू झालेली ही फ्रँचायझी आजही प्रेक्षकांची प्रचंड आवडती आहे.