'धुरंधर २' रिलीज होताच दिग्दर्शक आदित्य धरला मागावी लागली माफी! असं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 08:52 IST2026-03-19T08:46:51+5:302026-03-19T08:52:12+5:30
धुरंधर २ रिलीज होताच आदित्य धरला प्रेक्षकांची जाहीर माफी मागावी लागली. काय घडलं नेमकं?

'धुरंधर २' रिलीज होताच दिग्दर्शक आदित्य धरला मागावी लागली माफी! असं काय घडलं?
रणवीर सिंगच्या बहुप्रतिक्षित 'धुरंधर २' (Dhurandhar 2) या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच एक महत्त्वाची तांत्रिक अडचण समोर आली आहे. या चित्रपटाचे तमिळ, तेलगू आणि कन्नड यांसारख्या प्रादेशिक भाषांमधील 'पेड प्रिव्ह्यू' (Paid Previews) शोज रद्द करण्यात आले. या अनपेक्षित निर्णयामुळे दाक्षिणात्य प्रेक्षकांमध्ये काहीशी नाराजी पसरली असून, दिग्दर्शक आदित्य धर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांची जाहीर माफी मागितली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सेन्सॉर बोर्डाने (CBFC) ऐनवेळी काही कट्स सुचवल्याने सर्व भाषांच्या प्रिंट्समध्ये हा बदल अपडेट करण्यासाठी खूप वेळ लागला. तांत्रिक प्रक्रियेत झालेल्या या उशिरामुळे प्रादेशिक भाषांमधील डिजिटल कॉपिज चित्रपटगृहांपर्यंत वेळेत पोहोचू शकल्या नाहीत. यामुळे निर्मात्यांना नाईलाजास्तव विशेष शो रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला. आदित्य धर यांनी स्पष्ट केले की, प्रेक्षकांना एक परिपूर्ण चित्रपट अनुभव मिळावा, यासाठी त्यांनी प्राधान्य दिले होते. त्यामुळे तांत्रिक चुकांसह चित्रपट दाखवणे त्यांना मान्य नव्हते.
आदित्य धर यांनी सोशल मीडियावर जाहीर निवेदनात म्हटलं की, "आम्ही रात्रभर प्रयत्न करूनही तांत्रिक कारणांमुळे प्रादेशिक भाषांमधील प्रिव्ह्यू शोज वेळेत सुरू करू शकलो नाही. मल्याळम आणि कन्नडामधील शो रद्द करावे लागले. यामुळे ज्या चाहत्यांना त्रास झाला, त्यांची मी मनापासून माफी मागतो. मात्र, उद्यापासून हा चित्रपट सर्व भाषांमध्ये पाहायला मिळेल, याची आम्ही खात्री देत आहोत."
या प्रिव्ह्यू शोजसाठी ज्या प्रेक्षकांनी आगाऊ तिकीट बुक केले होते, त्यांना त्यांचे पैसे रिफंड मिळतील, असंही आदित्य म्हणाला. 'धुरंधर २'बद्दल सांगायचं तर सेन्सॉर बोर्डाच्या कट्समुळे चित्रपटाची लांबी ६ मिनिटांनी कमी झाली असून, आता हा नवा बदललेला फॉरमॅट सर्वत्र लागू करण्यात आला आहे. 'धुरंधर २' बद्दल प्रेक्षकांमध्ये असलेली प्रचंड उत्सुकता पाहता, हा छोटासा अडथळा बॉक्स ऑफिसवर फारसा परिणाम करणार नाही, अशी आशा सर्वांना आहे.