"१२ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये..." डायना पेंटीचा खुलासा, म्हणाली "मी मनाने विवाहित"
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 11:37 IST2025-06-20T11:31:07+5:302025-06-20T11:37:18+5:30
डायना गेल्या अनेक वर्षांपासून तिच्या बॉयफ्रेंडसोबत राहतेय.

"१२ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये..." डायना पेंटीचा खुलासा, म्हणाली "मी मनाने विवाहित"
Diana Penty Relationship Harsh Sagar: 'कॉकटेल' आणि 'हॅपी भाग जायेगी'सारख्या चित्रपटांतून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अभिनेत्री म्हणजे डायना पेंटी (Diana Penty). सध्या तिच्या आगामी 'डिटेक्टिव्ह शेरदिल' चित्रपटामुळे चर्चेत आहे. मात्र, चित्रपटाइतकीच तिच्या खासगी आयुष्याचीही सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. याच डायनाने तिच्या १२ वर्षांच्या प्रेमसंबंधावर मोठा खुलासा केलाय. गेल्या १२ वर्षांपासून हर्ष सागरसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचं तिनं सांगितलं आहे.
'हेदरफ्लाय'ला दिलेल्या एका मुलाखतीत डायनाने हर्ष सागरसोबतच्या तिच्या नात्याविषयी खुलासा केला. तिनं सांगितलं की, "मी आणि हर्ष एकमेकांना गेल्या २२ वर्षांपासून ओळखतो आणि मागील १२ वर्षांपासून आमचं नातं अधिक दृढ झालं आहे". डायनाने स्पष्ट केलं की तिला कधीच कॅज्युअल रिलेशनशिपमध्ये रस नव्हता. ठमी जुन्या विचारांची आहे. जेव्हा एखाद्या नात्यात असते, तेव्हा मी त्यात पूर्णपणे समर्पित असते", असं ती म्हणाली. तिचं नातं सार्वजनिक करण्याबाबत ती म्हणाली, "मी त्यासाठी छतावर जाऊन ओरडणार नाही. आमचं नातं खास आहे आणि ते तसंच ठेवणं मला जास्त प्रिय आहे".
लग्नाविषयी विचारल्यावर डायना म्हणाली, मी अजून लग्न केलेलं नाही, पण माझ्या मनात मी आधीच विवाहित आहे. तेच खरे नातं असतं. जेव्हा तुम्ही एकमेकांचा आदर करता, समजून घेता आणि आनंदी राहता. आमच्या दोघांच्याही कुटुंबांनी आम्हाला पूर्ण पाठिंबा दिला आहे आणि त्यांनी कधीच लग्नासाठी दबाव टाकलेला नाही". डायना पुढे म्हणाली, "आम्ही एकत्र राहतो, आमचं एक पाळीव कुत्रं आहे. कोणतीही औपचारिकता किंवा कागदपत्रांशिवाय आमचं नातं हे लग्नासारखंच आहे. लग्नाबाबत मला काहीच अडचण नाही, पण आम्ही सध्या खूप समाधानी आहोत".
२०१२ साली दीपिका पदुकोण आणि सैफ अली खानसोबत 'कॉकटेल' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या डायना पेंटीने 'हॅपी भाग जायेगी', 'परमाणू', 'शिद्दत' यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. आता ती रवी छाब्रिया दिग्दर्शित 'डिटेक्टिव्ह शेरदिल' या चित्रपटात दिलजीत दोसांझसोबत झळकणार आहे. हा चित्रपट २० जून २०२५ रोजी ZEE5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.