एकमेकांच्या अंगावर धावून गेले, ढकललं अन्...; 'धुरंधर' पाहायला गेलेल्या प्रेक्षकांमध्ये चांगलीच जुंपली, काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 09:15 IST2025-12-11T09:11:25+5:302025-12-11T09:15:44+5:30
'धुरंधर' पाहण्यासाठी गेलेले प्रेक्षक एकमेकांना भिडले, नेमकं काय घडलं?

एकमेकांच्या अंगावर धावून गेले, ढकललं अन्...; 'धुरंधर' पाहायला गेलेल्या प्रेक्षकांमध्ये चांगलीच जुंपली, काय घडलं?
Dhurandhar Movie: आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर'(Dhurandhar) सिनेमाची सध्या जोरदार चर्चा चालू आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. देशभरात अनेक ठिकाणी या सिनेमाचे शो हाऊसफुल आहेत. जिकडे-तिकडे बघावं तर बॉक्स ऑफिसवर याच सिनेमाची चलती आहे.रणवीर सिंहची मुख्य भूमिका असलेल्या या स्पाय थ्रिलर चित्रपटाने १५० कोटींचा टप्पा ओलांडला असून प्रेक्षक हा सिनेमा पाहण्यासाठी थिएटरमध्ये गर्दी करत आहेत. संजय दत्त , अर्जुनराम पाल , आर माधवन सारख्या अनुभवी कसलेल्या स्टार कास्ट या चित्रपटात पाहायला मिळतेय. एकीकडे या चित्रपटाची चर्चा असतानाच सोशल मीडियावर मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधील एक व्हिडीओ चर्चेचा विषय ठरलाय.या प्रकारामुळे चित्रपटाला गालबोट लागलं आहे.

दरम्यान, भोपाळमधील एका मल्टीप्लेक्समध्ये रणवीर सिंगचा 'धुरंधर' पाहत असताना प्रेक्षकांच्या दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये काही लोक एकमेकांना ढकलताना आणि धक्काबुक्की करताना दिसत आहेत. त्यानंतर हा वाद इतका टोकाला गेला की लोक खुर्च्या तोडू लागले आणि एकमेकांच्या अंगावर धावून जाऊ लागले.काही वेळातच संपूर्ण हॉलमध्ये गोंधळ उडाला आणि घाबरलेले प्रेक्षक त्यांच्या जागा सोडून बाहेर पडण्याच्या दिशेने धावू लागले.
वादाचं कारण काय?
इंडिया टुडेच्या वृत्तानुसार,चित्रपट सुरु असताना थिएटरमध्ये शिट्टी वाजवण्यावरून किंवा विचित्र आवाज काढल्यामुळे दोन गटांत बाचाबाची झाली. चित्रपट सुरू झाल्यानंतर काही वेळातच या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले.त्यादरम्यान, सिनेमागृहात उपस्थित असलेल्या तेथील कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रयत्नानंतर परिस्थिती नियंत्रणात आणली. सुदैवाने, कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी,परंतु बरेच प्रेक्षक प्रचंड घाबरले होते, असं थिएटर मॅनेजरने सांगितलं.
या प्रकरणी थिएटरच्या कर्मचाऱ्यांनी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून आता पोलीस सीसीटीव्ही फुटेज, व्हायरल व्हिडिओ आणि प्रत्यक्षदर्शींच्या जबाबांच्या आधारे या घटनेची चौकशी करत आहेत.