'धुरंधर' विरोधात पाकिस्तान कोर्टात जाणार? संजय दत्तने साकारलेल्या चौधरी अस्लमची पत्नी म्हणाली- "आम्ही मुस्लिम आहोत..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 17:35 IST2025-12-08T17:35:06+5:302025-12-08T17:35:32+5:30
'धुरंधर' सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. चौधरी अस्लम खानची पत्नी नोरीन यांनी रणवीरच्या सिनेमातील काही डायलॉगवर नाराजी व्यक्त करत कायदेशीर कारवाई करणार असल्याचं म्हटलं आहे.

'धुरंधर' विरोधात पाकिस्तान कोर्टात जाणार? संजय दत्तने साकारलेल्या चौधरी अस्लमची पत्नी म्हणाली- "आम्ही मुस्लिम आहोत..."
रणवीर सिंगचा 'धुरंधर' सिनेमा सत्य घटनेवर आधारित आहे. आणि या सिनेमातील काही भूमिकाही खऱ्या आयुष्यातील व्यक्तींवर आधारित आहेत. या सिनेमात रणवीरने मेजर मोहित शर्मा या पाकिस्तानात भारतीय गुप्तहेर बनून राहिलेल्या भारतीय लष्कर अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. तर सिनेमात अभिनेता संजय दत्तपाकिस्तानी पोलीस अधिकारी चौधरी अस्लम खानच्या भूमिकेत आहे. पण, 'धुरंधर' सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. चौधरी अस्लम खानची पत्नी नोरीन यांनी रणवीरच्या सिनेमातील काही डायलॉगवर नाराजी व्यक्त करत कायदेशीर कारवाई करणार असल्याचं म्हटलं आहे.
डायलॉग पाकिस्तान या पॉडकास्टमध्ये नोरीन यांनी 'धुरंधर' सिनेमा आणि संजय दत्तने साकारलेल्या त्यांच्या पतीच्या भूमिकेबद्दल भाष्य केलं. त्या म्हणाल्या, "खलनायक सिनेमा पाहिल्यापासून माझे पती(चौधरी अस्लम खान) संजय दत्तचे फॅन होते. संजय दत्त माझ्या पतीच्या भूमिकेला पुरेपूर न्याय देतील याची मला खात्री आहे". 'धुरंधर' सिनेमात संजय दत्तने साकारलेल्या एसपी चौधरी अस्लम खान यांच्या व्यक्तिरेखेची ओळख करून देताना सैतान आणि जीन यांची संतती असे शब्द वापरण्यात आले आहेत.
'धुरंधर'मधील या वाक्यावर चौधरी अस्लम खानची पत्नी नोरीन यांनी आक्षेप घेतला आहे. "आम्ही मुस्लिम आहोत आणि असे शब्द फक्त अस्लमचा नव्हे तर त्यांच्या आईचाही अपमान करतात जी एक साधी आणि प्रामाणिक स्त्री होती. जर मला असं जाणवलं की माझ्या पतीची चुकीची इमेज किंवा काही प्रपोगंडा सिनेमात दाखवला गेला आहे तर मी त्याविरोधात नक्कीच कायदेशीर कारवाई करेन. भारतीय फिल्ममेकर्सला पाकिस्तानची बदनामी करण्याशिवाय दुसरे विषय सापडतच नाहीत", असं त्या म्हणाल्या आहेत.
रणवीरचा 'धुरंधर' सिनेमा बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई करत आहे. आदित्य धार दिग्दर्शित या सिनेमात रणवीर आणि संजय दत्तसह आर माधवन, अर्जुन रामपाल, अक्षय खन्ना, सारा अर्जुन यांच्या मुख्य भूमिका आहेत.