'धुरंधर'च्या सेटवरुन १२० हून अधिक लोकांना रुग्णालयात केलं दाखल, समोर आलं धक्कादायक कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 11:39 IST2025-08-19T11:37:52+5:302025-08-19T11:39:27+5:30

रणवीर सिंगच्या 'धुरंधर' सिनेमाच्या सेटवरुन मोठी घटना घडली आहे. एकाच वेळी १२० हून अधिक माणसांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची वेळ आली आहे

dhurandhar movie set More than 120 people were admitted to the hospital due to food poisoning | 'धुरंधर'च्या सेटवरुन १२० हून अधिक लोकांना रुग्णालयात केलं दाखल, समोर आलं धक्कादायक कारण

'धुरंधर'च्या सेटवरुन १२० हून अधिक लोकांना रुग्णालयात केलं दाखल, समोर आलं धक्कादायक कारण

रणवीर सिंगच्या आगामी 'धुरंधर' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान एक दुर्दैवी घटना घडली आहे. लडाखमधील लेह येथे चित्रपटाच्या सेटवर फूड पॉयजनिंगमुळे १०० हून अधिक क्रू मेंबर्स आजारी पडले. त्यामुळे तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना रविवारी, १७ ऑगस्ट रोजी घडली, ज्यामुळे चित्रपटाचे शूटिंग थांबवण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 'धुरंधर' चित्रपटाचे युनिट लेहच्या पट्थर साहिब भागात शूटिंग करत होते. रविवारी रात्रीच्या जेवणानंतर अनेक क्रू मेंबर्सना पोटदुखी, उलट्या आणि डोकेदुखीचा त्रास सुरू झाला. त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना लगेचच लेह येथील साजल नर्बू मेमोरियल (SNM) रुग्णालयात दाखल करण्यात आले.

डॉक्टरांनी या घटनेला 'मास फूड पॉयजनिंग'चे (मोठ्या प्रमाणावर अन्नातून विषबाधा) प्रकरण म्हटले आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, सुमारे ६०० लोकांनी जेवण घेतले होते, त्यापैकी १२५ हून अधिक लोक आजारी पडले. रुग्णालयात अचानक गर्दी वाढल्याने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनाही पाचारण करण्यात आले. प्रशासनाने तातडीने या प्रकरणाची दखल घेतली आहे. खाद्यपदार्थांचे नमुने गोळा करून तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

या घटनेला कारणीभूत असलेल्या केटरिंग कंपनीवर कठोर कारवाई केली जाईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. सुदैवाने, आजारी पडलेल्या बहुतांश क्रू मेंबर्सची प्रकृती स्थिर असून, त्यांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. रणवीर सिंग आणि चित्रपटाच्या निर्मात्यांनी अद्याप या घटनेवर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिली नाही. आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' या स्पाय-थ्रिलर चित्रपटात रणवीर सिंगसोबत संजय दत्त, आर माधवन, अक्षय खन्ना आणि अर्जुन रामपाल असे मोठे कलाकार आहेत. हा चित्रपट ५ डिसेंबर २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. या घटनेमुळे चित्रपटाच्या शूटिंगच्या शेड्यूलवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

Web Title: dhurandhar movie set More than 120 people were admitted to the hospital due to food poisoning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.