"४९ वर्षांत असं स्टारडम कधीच अनुभवता आलं नाही…", 'धुरंधर'ला मिळालेलं यश पाहून भारावला अभिनेता, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2026 12:06 IST2026-01-04T12:02:28+5:302026-01-04T12:06:44+5:30
"४९ वर्षांत असं स्टारडम कधीच अनुभवता आलं नाही…", 'धुरंधर'च्या यशाबद्दल लोकप्रिय अभिनेत्याचं वक्तव्य

"४९ वर्षांत असं स्टारडम कधीच अनुभवता आलं नाही…", 'धुरंधर'ला मिळालेलं यश पाहून भारावला अभिनेता, म्हणाले...
Dhurandhar Film: बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगची मुख्य भूमिका असलेला 'धुरंधर' हा सिनेमा प्रदर्शित होऊन जवळपास एक महिन्यांचा कालावधी लोटला आहे. मात्र, अद्यापही या चित्रपटाची क्रेझ काही कमी झालेली नाही. या चित्रपटाने संपूर्ण जगभरात १ हजार कोटींपेक्षा जास्त गल्ला जमवला आहे. आदित्य धर दिग्दर्शित या सिनेमात रणवीर सिंहसह अक्षय खन्ना, अर्जुन रामपाल आणि रजत बेदी हे कलाकार देखील प्रमुख भूमिकेत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर उत्तम कामगिरी करत आहे, याचं कारण म्हणजे त्यातील कलाकारांची मेहनत आहे.
'धुरंधर' चित्रपटात अभिनेते राकेश बेदी यांनी जमील जमालीची भूमिका साकारली आहे. या प्रभावी भूमिकेतून त्यांनी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. हा जमील जमाली रेहमान डकैतला पाठिंबा देताना दिसतो. अलिकडेच चित्रपटाचे कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा यांनी खुलासा केला की, चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद पाहून राकेश बेदी यांना अश्रू अनावर झाले होते. इंडिया टुडेसोबत संवाद साधताना मुकेश छाब्रा यांनी सांगितलं की, नुकतेच ते राकेश बेदी यांना त्यांच्या कार्यालयात भेटले होते. त्यादरम्यान, राकेश यांनी त्यांना धुरंधरमधील आपल्या पात्राबद्दल प्रतिक्रिया दिली. तेव्हा मुकेश छाब्रा यांनी सांगितलं, राकेश मला म्हणाले-"मी ४९ वर्षांपासून अभिनय करत आहे, पण मला आतासारखं स्टारडम कधीच मिळालं नाही."'त्यावेळी बोलताना राकेश यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.'
कास्टिंगबद्दल मुकेश छाब्रा काय म्हणाले?
त्यानंतर मुकेश यांनी चित्रपटाच्या कास्टिंगचा किस्सा शेअर केला. ते म्हणाले," मला लोकांना आश्चर्यचकित करायला आवडतं. हाच माझा दृष्टिकोन आहे.मी नेहमी विचार करत असतो की, मी प्रेक्षकांना कसे आश्चर्यचकित करू शकेन? मी या पात्रांना एक वेगळं रूप कसं देऊ शकेन? कायम हाच विचार माझ्या डोक्यात सुरु असतो." असा खुलासा त्यांनी मुलाखतीत केला.