'धुरंधर' अक्षय खन्नाच्या सावत्र आईची प्रतिक्रिया; म्हणाली, "मी कधीच त्याची आई झाले नाही कारण..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 10:45 IST2025-12-15T10:44:33+5:302025-12-15T10:45:36+5:30
सावत्र आईसोबत कसं आहे अक्षय खन्नाचं नातं, कविता खन्ना म्हणाल्या...

'धुरंधर' अक्षय खन्नाच्या सावत्र आईची प्रतिक्रिया; म्हणाली, "मी कधीच त्याची आई झाले नाही कारण..."
९० दशकात बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा अभिनेता अक्षय खन्ना आता २०२५ मध्ये कमालीचा लोकप्रिय झाला आहे. इतक्या वर्षांनी त्याला त्याच्या मेहनतीचं फळ मिळत आहे. त्याच्या टॅलेंटची दखल घेतली गेली आहे. नुकत्याच रिलीज झालेल्या 'धुरंधर' सिनेमातील त्याचा परफॉर्मन्स, स्वॅग, डान्स यामुळे तो प्रचंड व्हायरल होत आहे. अक्षय खन्ना हा दिवंगत अभिनेते विनोद खन्नांचा मुलगा आहे. विनोद खन्नांची दुसरी पत्नी आणि अक्षयची सावत्र आई कविता खन्ना यांनी नुकतीच आता अक्षय खन्नाच्या व्हायरल होण्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
'धुरंधर'ला मिळत असलेल्या तुफान यशानंतर अक्षय खन्नाचं सर्वत्र कौतुक होत आहे. त्याचे चाहते तर त्याचं स्तुती करताना थकत नाहीयेत. तर आता त्याच्या सावत्र आईनेही प्रतिक्रिया दिली आहे. अक्षयसोबत तिचं नेमकं कसं नातं आहे यावर ती बोलली आहे. विनोद खन्नांची दुसरी बायको कविता खन्ना यांनी नुकतीच पत्रकार लवीना टंडनला मुलाखत दिली. यावेळी अक्षय खन्नासोबतच्या नात्यावर कविता म्हणाल्या, "मी कधीच अक्षयची आई होण्याचा प्रयत्न केला नाही. कारण त्याच्याजवळ आधीपासूनच एक बेस्ट आई आहे."
कविता विनोद खन्ना यांच्यासोबत असलेल्या स्पिरिच्युअल कनेक्शनबद्दल म्हणाल्या, 'वो एक जुनून और प्यार था. आमचं एकमेकांसोबत चांगलं ताळमेळ होतं. सर्व अवगुणांसहित आमचं लग्न अगदी परफेक्ट होतं."
विनोद खन्ना यांनी १९७१ मध्ये गीतांजलीसोबत पहिलं लग्न केलं होतं. राहुल आणि अक्षय ही त्यांची दोन मुलं. १९८५ साली त्यांचा घटस्फोट झाला. याचं कारण विनोद खन्ना यांनी अध्यात्माचा मार्ग स्वीकारला होता. त्यांनी करिअरच्या शिखरावर असताना संन्यास घेतला. ते पत्नी आणि मुलांना सोडून अनेक वर्ष ओशोंच्या आश्रमात होते. नंतर काही वर्षांनी त्यांनी परत येण्याचा निर्णय घेतला. १९९० साली त्यांनी कविताशी दुसरं लग्न केलं. त्यांना साक्षी हा मुलगा आणि श्रद्धा ही मुलगी आहे.