'धुरंधर'ला 'प्रोपगंडा' म्हणणाऱ्या ध्रुव राठीला आदित्य धरचं सडेतोड उत्तर, शेअर केली 'ती' पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 18:07 IST2025-12-26T18:07:18+5:302025-12-26T18:07:41+5:30
'धुरंधर'वर टीका करणाऱ्या ध्रुव राठीला आदित्य धरनं सडेतोड उत्तर दिलंय.

'धुरंधर'ला 'प्रोपगंडा' म्हणणाऱ्या ध्रुव राठीला आदित्य धरचं सडेतोड उत्तर, शेअर केली 'ती' पोस्ट
आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' हा सिनेमा ५ डिसेंबरला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. रणवीर सिंग, संजय दत्त, आर. माधवन, अक्षय खन्ना आणि अर्जुन रामपाल यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटान जगभरात धुमाकूळ घातला. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर सुसाट धावत आहे. प्रेक्षकांनी या चित्रपटाला डोक्यावर घेतले आहे. एकिकडे चित्रपटाचं कौतुक होत असताना युट्युबर ध्रुव राठीने 'धुरंधर' चित्रपटाला 'प्रोपगंडा' म्हणत टीका केली. यावर आता दिग्दर्शक आदित्य धरनं ध्रुव राठीला प्रत्युत्तर दिले आहे.
आदित्य धरनं त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एका चाहत्याची पोस्ट शेअर करत ध्रुव राठीला अप्रत्यक्ष टोला लगावला. या पोस्टमध्ये नाव न घेता ध्रुव राठीवर निशाणा साधण्यात आला. या पोस्टमध्ये लिहिले होते की, "भारतीय चित्रपटात इतिहास पुन्हा लिहिला जात आहे. ज्यांच्या हृदयात आग आहे आणि त्यांना देशाबद्दल प्रेम आहे, त्या पुरूष आणि स्त्रीयांना चित्रपट आवडतोय. धुरंधरच्या बॉक्स ऑफिसवरील यशाचा सर्वात चांगला भाग म्हणजे तो नैसर्गिक आहे. प्रदर्शित झाल्यानंतर कॉर्पोरेट बुकिंगचा आरोप करणारे सर्वजण आता गप्प झाले आहेत".
या पोस्टमध्ये पुढे ध्रुव राठीचा उल्लेख करत म्हटले आहे की, "अलीकडेच एका व्हिडीओ बनविणाऱ्याने चित्रपटावर टीका करण्याचा प्रयत्न केला, पण तो स्वतःच टीकेच्या लाटेत वाहून गेला. 'धुरंधर' ही एक अशी त्सुनामी आहे, जी २०२६ पर्यंत टिकेल आणि मार्गातील सर्व अडथळ्यांना वाहून नेत, काही केल्या थांबणार नाही".
आदित्य धरचे कौतुक करताना यात पुढे लिहलं होतं की, "दिल्लीतील तरूण दिग्दर्शक आदित्य धर आणि त्यांच्या टीमने ही त्सुनामी तयार केली. चित्रपटातील कलाकार, तंत्रज्ञ आणि सर्वच लोक एका ध्येयाने पछाडलेले दिसतात. त्यांनी दिग्दर्शकाचा विश्वास सार्थ करून दाखवत एक चांगली कथा सादर केली आहे". ही पोस्ट शेअर करत आदित्य धरनं ध्रुव राठीला अप्रत्यक्ष टोला लगावला.
'धुरंधर'नं २१ दिवसांत कमावले तब्बल 'इतके' कोटी
जगभरात 'धुरंधर'च्या कमाईचा डंका वाजतोय. 'धुरंधर'ने २१ व्या दिवशी भारतात ६५० कोटींची कमाई केली आहे. तर भारताबाहेरील देशांमध्ये सिनेमाने २१७ कोटींची कमाई केली आहे. अशाप्रकारे 'धुरंधर' सिनेमाने एकूण कमाईत १००० कोटींचा आकडा ओलांडला आहे. त्यामुळे जगभरात 'धुरंधर'चीच हवा असल्याच चित्र स्पष्ट झालं आहे. 'धुरंधर'चा पार्ट २ १९ मार्च २०२६ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
