Dhurandhar BO Day 4: रणवीर सिंगच बॉक्स ऑफिसचा खरा 'धुरंंधर'! सिनेमाची ४ दिवसांची कमाई वाचून थक्क व्हाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 09:34 IST2026-03-23T09:33:29+5:302026-03-23T09:34:31+5:30
रणवीर सिंह स्टारर 'धुरंधर २: द रिव्हेंज' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला असून अवघ्या चार दिवसांत या चित्रपटाने अनेक मोठ्या चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत

Dhurandhar BO Day 4: रणवीर सिंगच बॉक्स ऑफिसचा खरा 'धुरंंधर'! सिनेमाची ४ दिवसांची कमाई वाचून थक्क व्हाल
रणवीर सिंह स्टारर 'धुरंधर २: द रिव्हेंज' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला असून अवघ्या चार दिवसांत या चित्रपटाने अनेक मोठ्या चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासूनच या स्पाय थ्रिलरने प्रेक्षकांना सिनेमागृहांकडे खेचून आणले आहे. या चित्रपटाने केवळ देशातच नव्हे, तर जागतिक स्तरावरही आपली छाप पाडली असून अवघ्या चार दिवसांत 'धुरंधर २' जगभरातील कमाई ६९१.३२ कोटी रुपयांची विक्रमी कमाई केली आहे.
रविवारी सुट्टीचा फायदा घेत या चित्रपटाने भारतात ११४.८५ कोटी रुपयांचे कलेक्शन केले, जे शनिवारी केलेल्या ११३ कोटींच्या कमाईपेक्षाही जास्त आहे. या प्रचंड प्रतिसादामुळे 'धुरंधर २' चित्रपटाने सनी देओलच्या 'गदर २', रजनीकांत यांच्या 'जेलर' आणि प्रभासच्या 'सालार' यांसारख्या दिग्गज चित्रपटांच्या एकूण कमाईला मागे टाकले आहे. भारतातील 'धुरंधर २' या चित्रपटाचे आतापर्यंतचे एकूण कलेक्शन ४५४.१२ कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
आदित्य धर यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटात रणवीर सिंगसोबतचसंजय दत्त, अर्जुन रामपाल आणि आर. माधवन यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. चित्रपटातील जबरदस्त ॲक्शन आणि खिळवून ठेवणारी कथा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.
आता हा चित्रपट ७०० कोटींच्या क्लबमध्ये कधी सामील होतो आणि आमिर खानच्या 'पीके' किंवा 'स्त्री २' चे रेकॉर्ड मोडतो का, याकडे चित्रपटसृष्टीचे लक्ष लागले आहे. ज्या वेगाने हा चित्रपट कमाई करत आहे, ते पाहता लवकरच हा चित्रपट ८०० कोटींचा टप्पा पार करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.