रणवीर सिंग-अक्षय खन्ना भाव खाऊन गेले; 'धुरंधर'चा बॉक्स ऑफिसवर धोबीपछाड, चारच दिवसांत १००कोटी पार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 12:03 IST2025-12-09T12:03:09+5:302025-12-09T12:03:34+5:30
सिनेमा रिलीज झाल्यानंतर 'धुरंधर' पाहण्यासाठी चाहते थिएटरमध्ये गर्दी करत आहेत. 'धुरंधर'चे शो सगळीकडे हाऊसफूल होत आहे. या सिनेमाने चार दिवसांतच १०० कोटी पार केले आहेत.

रणवीर सिंग-अक्षय खन्ना भाव खाऊन गेले; 'धुरंधर'चा बॉक्स ऑफिसवर धोबीपछाड, चारच दिवसांत १००कोटी पार
अॅक्शन स्पाय थ्रिलर असलेल्या 'धुरंधर' सिनेमाची सगळे आतुरतेने वाट पाहत होते. अखेर शुक्रवारी(५ डिसेंबर) हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित झाला. सिनेमातील रणवीर सिंगच्या लूकने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. त्यामुळे 'धुरंधर' सिनेमाची चाहत्यांना घाई झाली होती. सिनेमा रिलीज झाल्यानंतर 'धुरंधर' पाहण्यासाठी चाहते थिएटरमध्ये गर्दी करत आहेत. 'धुरंधर'चे शो सगळीकडे हाऊसफूल होत आहे. या सिनेमाने चार दिवसांतच १०० कोटी पार केले आहेत.
रणवीर सिंग, आर माधवन, अक्षय खन्ना, अर्जुन रामपाल, संजय दत्त, सारा अर्जुन अशी तगडी स्टारकास्ट असलेला 'धुरंधर' सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. पहिल्या दिवशी सिनेमाने २८ कोटींची कमाई केली होती. तर वीकेंडला 'धुरंधर'च्या कलेक्शनमध्ये वाढ झालेली दिसली. पहिल्या वीकेंडला सिनेमाने ७५ कोटींचा गल्ला जमवला. मंडे टेस्टमध्येही 'धुरंधर' पास झाला आहे. वीकेंडच्या तुलनेत कमाईत घट झाली असली तरी सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, 'धुरंधर' सिनेमाने सोमवारी २३ कोटींची कमाई केली. त्यामुळे ४ दिवसांत या सिनेमाने एकूण १२६.८८ कोटींचा गल्ला जमवला आहे.
पाकिस्तानात जाऊन राहिलेल्या भारतीय गुप्तहेरांच्या गुप्त कारवायांवर आधारित हा सिनेमा आहे. या सिनेमातून मेजर मोहित शर्मा या डॅशिंग लष्करी अधिकाऱ्याची कहाणी आणि कामगिरी दाखवण्यात आली आहे. 'धुरंधर' सिनेमात रणवीर सिंगने मेजर मोहित शर्मा यांची भूमिका साकारली आहे. रणवीर सिंगच्या भूमिकेचं सर्वत्र कौतुक होत आहे. पण, रणवीरसोबतच सिनेमात अभिनेता अक्षय खन्ना भाव खाऊन गेला आहे. अक्षय खन्नाने 'धुरंधर'मध्ये पाकिस्तानातील कराचीमधील कुख्यात गुंड असलेल्या रहमान डकैतची भूमिका साकारली आहे. 'धुरंधर' सिनेमाचं दिग्दर्शन आदित्य धारने केलं आहे. या सिनेमाचा दुसरा भाग मार्च २०२६ मध्ये प्रदर्शित होणार आहे.