'धुरंधर २' सुपरहिट पण आर.माधवनला मागावी लागली माफी! 'त्या' सीनमुळे लोकांच्या भावना दुखावल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 10:00 IST2026-03-25T09:55:53+5:302026-03-25T10:00:11+5:30
रणवीर सिंग स्टारर 'धुरंधर २: द रिव्हेंज' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाका केला असला तरीही, हा चित्रपट एका मोठ्या धार्मिक वादात सापडला आहे

'धुरंधर २' सुपरहिट पण आर.माधवनला मागावी लागली माफी! 'त्या' सीनमुळे लोकांच्या भावना दुखावल्या
रणवीर सिंग स्टारर 'धुरंधर २: द रिव्हेंज' (Dhurandhar 2) या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाका केला असला तरीही, हा चित्रपट एका मोठ्या धार्मिक वादात सापडला आहे. चित्रपटातील एका सीनमध्ये 'गुरबानी'चा चुकीच्या पद्धतीने वापर केल्याचा आरोप शीख समुदायाने केला आहे. या गंभीर प्रकरणावर आता चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणाऱ्या आर. माधवनने स्पष्टीकरण दिले असून माफी मागितली आहे.
काय आहे नेमका वाद?
'धुरंधर २' मधील एका सीनदरम्यान आर माधवन सिगारेट पिताना गुरबानीचा उल्लेख करतो, अशी चर्चा झाली आणि शीख समुदायाने भावना दुखावण्याचा आरोप केला. अखेर या वादावर स्वतः आर माधवनने खुलासा केला. तो म्हणाला, ''तुमचा गैरसमज झाला आहे. ज्या सीनमुळे हा वाद निर्माण झाला, त्यावेळी ते संवाद बोलण्याआधीच मी सिगरेट विझवली होती. त्यामुळे त्या सीनवेळी माझ्या हातात सिगरेटही नव्हती आणि तोंडातून धूरही निघत नव्हता. शूटिंगच्या वेळी आदित्य धरने या गोष्टीची काळजी घेतलेली आणि सिगरेट तिथून हटवली होती. कोणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नव्हता. त्यामुळे कोणाच्याही धार्मिक भावना दुखावू नये याची खबरदारी घेण्यात आली होती.''
''मी कायमच शिख समुदायाचा सन्मान करतो आणि त्यांच्यामागे खंबीरपणे उभा राहतो. शिख समाजाच्या भावनांचा मला आदर आहे. याशिवाय जेव्हा एखादा नवा सिनेमा रिलीज होणार असेल, तेव्हा मी अमृतसर येथील गोल्डन टेंपल येथे दर्शनास जातो. तरी कळत-नकळत कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर माफी मागतो'', असं स्पष्टीकरण आर.माधवनने दिलं आहे.
'धुरंधर २' विषयी सांगायचं तर, या सिनेमात रणवीर सिंग, आर. माधवन, अर्जुन रामपाल, संजय दत्त, सारा अर्जुन, राकेश बेदी या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. आदित्य धरने सिनेमाचं दिग्दर्शन केलं असून यामी गौतमचीही सिनेमात छोटीशी भूमिका आहे.