Dharmendra Passed Away: डोळ्यांत अश्रू अन् निस्तेज चेहरा! धर्मेंद्र यांच्या निधनाने पत्नी हेमा मालिनी व्यथित
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 16:07 IST2025-11-24T16:06:48+5:302025-11-24T16:07:38+5:30
धर्मेंद्र यांच्या निधनाने त्यांच्या दुसऱ्या पत्नी आणि अभिनेत्री हेमा मालिनी या व्यथित झाल्या आहेत. धर्मेंद्र यांच्या पार्थिवावर विलेपार्ले येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या अंत्यसंस्काराला हेमा मालिनी उपस्थित होत्या.

Dharmendra Passed Away: डोळ्यांत अश्रू अन् निस्तेज चेहरा! धर्मेंद्र यांच्या निधनाने पत्नी हेमा मालिनी व्यथित
Dharmendra Passed Away: ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन झालं आहे. मुंबईतील राहत्या घरी ८९व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काही दिवसांपूर्वी त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल केलं गेलं होतं. पण प्रकृतीत सुधारणा झाल्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आलं होतं. नंतर त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. पण अखेर आज(२४ नोव्हेंबर) त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने कलाविश्वात कधीही भरुन न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. तर बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.
धर्मेंद्र यांच्या निधनाने त्यांच्या दुसऱ्या पत्नी आणि अभिनेत्री हेमा मालिनी या व्यथित झाल्या आहेत. धर्मेंद्र यांच्या पार्थिवावर विलेपार्ले येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या अंत्यसंस्काराला हेमा मालिनी उपस्थित होत्या. यावेळी मीडियासमोर हात जोडून त्यांनी दु:ख व्यक्त केलं. त्यांच्या डोळ्यांत अश्रू दिसत होते. तर चेहरा निस्तेज झाला होता. हेमा मालिनी यांच्यासोबत गाडीत त्यांची मुलगी आणि अभिनेत्री ईशा देओलही होती. धर्मेंद्र यांच्या निधनाने देओल कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
धर्मेंद्र आणि हेमा मालिनी हे बॉलिवूडमधील लोकप्रिय कपल होते. १९८०मध्ये त्यांनी लग्न केलं होतं. धर्मेंद्र यांचं हे दुसरं लग्न होतं. याआधी त्यांनी प्रकाश कौर यांच्यासोबत १९५४ मध्ये संसार थाटला होता. प्रकाश कौर यांच्यापासून धर्मेंद्र यांनी दोन मुली आणि सनी, बॉबी ही दोन मुले आहेत. तर हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांना ईशा देओल आणि अहाना देओल या मुली आहेत.
धर्मेंद्र यांनी जवळपास ३०० हून अधिक सिनेमांमध्ये काम केलं होतं. वयाची नव्वदी गाठली तरी ते बॉलिवूडमध्ये सक्रिय होते. १९६० साली अभिनयात पदार्पण केलेल्या धर्मेंद्र यांनी ६ दशकं प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. त्यांच्या आगामी सिनेमाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित करण्यात आला होता. धर्मेंद्र हे 'इक्कीस' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार होते. हाच त्यांचा शेवटचा सिनेमा ठरला. धर्मेद्र यांनी गेली अनेक वर्ष त्यांच्या अभिनयाने बॉलिवूडवर राज्य केलं. बॉलिवूडचे ही मॅन म्हणून धर्मेंद्र यांची ओळख होती. शोले, बंदिनी, हकीकत, मेरा कसूर क्या है, काजल, आकाशदीप, देवर अशा विविध सिनेमांमध्ये त्यांनी वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या. धर्मेंद्र यांचे अलीकडेच रॉकी और रानी की प्रेम कहानी आणि तेरी बातों में ऐसा उलझा जिया हे दोन सिनेमे रिलीज झाले होते. दोन्ही सिनेमांना बॉक्स ऑफिसवर सुपरहिट यश मिळालं.