Dharmendra: 'बाप'माणूस हरपला! वडिलांच्या निधनाने कोलमडून गेली ईशा देओल, स्मशानभूमीतील भावुक करणारा व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 14:35 IST2025-11-24T14:34:03+5:302025-11-24T14:35:07+5:30
धर्मेंद्र यांच्या निधनाने देओल कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. वडिलांच्या निधनाने ईशा देओल कोलमडून गेली आहे.

Dharmendra: 'बाप'माणूस हरपला! वडिलांच्या निधनाने कोलमडून गेली ईशा देओल, स्मशानभूमीतील भावुक करणारा व्हिडीओ
Dharmendra Passed Away: ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन झालं आहे. मुंबईतील राहत्या घरी ८९व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काही दिवसांपूर्वी त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल केलं गेलं होतं. पण प्रकृतीत सुधारणा झाल्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आलं होतं. नंतर त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. पण अखेर आज(२४ नोव्हेंबर) त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने बॉलिवूडमध्ये कधीही भरुन न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.
धर्मेंद्र यांच्या निधनाने देओल कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. निधनाची बातमी समजताच धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची मुलगी आणि अभिनेत्री ईशा देओलने स्मशानभूमीकडे धाव घेतली. धर्मेंद्र यांच्या अंत्यसंस्कारवेळीचा ईशाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. वडिलांच्या निधनाने ईशा देओल कोलमडून गेली आहे. अभिनेत्री भावुक झाल्याचं व्हिडीओत दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून चाहत्यांनीही दु:ख व्यक्त केलं आहे.
धर्मेंद्र यांच्या मृतदेहावर विलेपार्ले येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार पार पडले. देओल कुटुंबीयांनी साश्रू नयनांनी त्यांना अखेरचा निरोप दिला. सनी देओलने त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. सिनेसृष्टीतील काही कलाकारांनी त्यांच्या अंत्यसंस्काराला हजेरी लावली होती. अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, सलीम खान, संजय दत्त, आमिर खान, सलमान खान, अक्षय कुमार हे कलाकार धर्मेंद्र यांच्या अंत्यविधीला उपस्थित होते.
धर्मेंद्र यांनी जवळपास ३०० हून अधिक सिनेमांमध्ये काम केलं होतं. वयाची नव्वदी गाठली तरी ते बॉलिवूडमध्ये सक्रिय होते. १९६० साली अभिनयात पदार्पण केलेल्या धर्मेंद्र यांनी ६ दशकं प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. त्यांच्या आगामी सिनेमाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित करण्यात आला होता. धर्मेंद्र हे 'इक्कीस' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार होते. हाच त्यांचा शेवटचा सिनेमा ठरला. धर्मेद्र यांनी गेली अनेक वर्ष त्यांच्या अभिनयाने बॉलिवूडवर राज्य केलं. बॉलिवूडचे ही मॅन म्हणून धर्मेंद्र यांची ओळख होती. शोले, बंदिनी, हकीकत, मेरा कसूर क्या है, काजल, आकाशदीप, देवर अशा विविध सिनेमांमध्ये त्यांनी वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या. धर्मेंद्र यांचे अलीकडेच रॉकी और रानी की प्रेम कहानी आणि तेरी बातों में ऐसा उलझा जिया हे दोन सिनेमे रिलीज झाले होते. दोन्ही सिनेमांना बॉक्स ऑफिसवर सुपरहिट यश मिळालं.