'धुरंधर'मुळे निर्मात्यांना धडकी? धर्मेंद्र यांचा शेवटचा सिनेमा 'इक्कीस' २५ डिसेंबर नाही तर 'या' तारखेला रिलीज होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 11:55 IST2025-12-18T11:46:08+5:302025-12-18T11:55:38+5:30
धर्मेंद्र यांचा शेवटचा सिनेमा इक्कीसची रिलीज डेट पुढे गेली आहे. आता हा सिनेमा कोणत्या दिवशी प्रदर्शित होणार? जाणून घ्या

'धुरंधर'मुळे निर्मात्यांना धडकी? धर्मेंद्र यांचा शेवटचा सिनेमा 'इक्कीस' २५ डिसेंबर नाही तर 'या' तारखेला रिलीज होणार
बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक श्रीराम राघवन यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'इक्कीस'ची रिलीजआधीपासूनच खूप चर्चा होती. अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा याची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट आधी ख्रिसमसच्या मुहूर्तावर २५ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र, निर्मात्यांनी आता या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलली आहे. काय आहे 'इक्कीस' सिनेमाची नवी रिलीज डेट?
'इक्कीस' सिनेमाची नवी रिलीज डेट काय?
सध्या बॉक्स ऑफिसवर सुरू असलेल्या 'धुरंधर' चित्रपटाच्या अफाट यशामुळे 'इक्कीस'ची रिलीज डेट पुढे ढकलण्याचा हा निर्णय घेण्यात आला असावा, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. रणवीर सिंग आणि अक्षय खन्ना स्टारर 'धुरंधर'ने अवघ्या १२ दिवसांत जगभरात ६०० कोटींहून अधिक कमाई करून एक प्रकारचे वादळ निर्माण केले आहे. 'धुरंधर'च्या लाटेत 'इक्कीस'च्या कमाईवर परिणाम होऊ नये आणि कार्तिक आर्यनच्या आगामी चित्रपटाशी होणारी टक्कर टाळता यावी, यासाठी निर्मात्यांनी 'इक्कीस' सिनेमा एक आठवडा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता 'इक्कीस' हा सिनेमा नवीन वर्षात अर्थात १ जानेवारी २०२६ ला रिलीज होणार आहे.
'इक्कीस' हा चित्रपट परमवीर चक्र विजेते सेकंड लेफ्टनंट अरुण खेत्रपाल यांच्या शौर्यावर आधारित आहे. ते भारतीय लष्करातील सर्वात तरुण वयात परमवीर चक्र मिळवणारे अधिकारी होते. या चित्रपटात अगस्त्य नंदासोबत अक्षय कुमारची भाची सिमर भाटिया पदार्पण करत आहे. तसेच जयदीप अहलावत आणि दीपक डोबरियाल यांसारखे ताकदीचे कलाकारही यात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
मॅडॉक फिल्म्सने 'इक्कीस'ची रिलीज डेट पुढे गेल्याची अधिकृत घोषणा केली आहे. या चित्रपटाचा फायनल ट्रेलर येत्या वीकेंडला चित्रपटगृहात प्रदर्शित केला जाणार आहे. नव्या वर्षाची सुरुवात एका ऐतिहासिक आणि प्रेरणादायी कथेने करण्यासाठी आता प्रेक्षकांना १ जानेवारीची वाट पाहावी लागणार आहे. धर्मेंद्र यांचा शेवटचा सिनेमा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.