"त्यांचं अचूक टायमिंग..", धर्मेंद्र यांचा शेवटचा सिनेमा 'इक्कीस'; सुहासिनी मुळेंनी सांगितली आठवण
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 10:25 IST2025-11-25T10:23:59+5:302025-11-25T10:25:16+5:30
मला बघताच ते कितीही त्रास होत असला तरी खुर्चीवरुन उठले अन्..., धर्मेंद्र यांच्या शेवटच्या सिनेमाच्या सेटवरील आठवणी

"त्यांचं अचूक टायमिंग..", धर्मेंद्र यांचा शेवटचा सिनेमा 'इक्कीस'; सुहासिनी मुळेंनी सांगितली आठवण
हिंदी सिनेसृष्टीतील सर्वात देखणे हिरो अशी ख्याती असलेले ही-मॅन म्हणजेच धर्मेंद्र यांचं काल निधन झालं. ८९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने अख्खी इंडस्ट्री पोरकी झाली आहे. 'शोले'च्या वीरुने जगाचा निरोप घेतल्यानंतर 'जय'ने म्हणजेच अमिताभ बच्चन यांनी भावुक पोस्ट लिहिली. धर्मेंद्र यांचे कुटुंबीय, चाहते आणि संपूर्ण इंडस्ट्री शोकसागरात बुडाली. आगामी 'इक्कीस' या सिनेमात धर्मेंद्र दिसणार आहेत. हा त्यांच्या कारकिर्दीतील शेवटचा सिनेमा असणार आहे. या सिनेमात अभिनेत्री सुहासिनी मुळे यांनी त्यांच्यासोबत स्क्रीन शेअर केली आहे. नुकतंच धर्मेंद्र यांच्या शेवटच्या सिनेमाच्या सेटवरील आठवणी त्यांनी सांगितल्या.
न्यूज १८ शी बोलताना सुहासिनी मुळे यांनी धर्मेंद्र यांच्यासोबतचा 'इक्कीस' सिनेमातला अनुभव सांगितला. त्या म्हणाल्या, "धर्मेंद्र भलेही ८९ वर्षांचे होते पण त्यांच्या डायलॉग्सचं टायमिंग अजूनही तसंच होतं. माझे त्यांच्यासोबत थोडेसेच सीन्स होते. जेव्हा मी पहिल्यांदा त्यांना भेटले तेव्हा ते खुर्चीवर बसले होते. मला बघताच ते कितीही त्रास होत असला तरी खुर्चीवरुन उठले आणि मला बसायला सांगितलं. मी म्हणाले,'तुम्ही बसा..'. तेव्हा ते म्हणाले, 'आप बैठेंगी, तभी मै बैठूंगा...नही तो मै कैसे बैठ सकता हूँ?'
त्या पुढे म्हणाल्या, "ते स्टार कलाकार होते पण त्यांनी कधीच आजूबाजूच्या लोकांना तसं जाणवू दिलं नाही. लोक त्यांच्यासोबत फोटो काढायचे. उभं राहू शकत नसल्याने ते खुर्चीवरच बसून राहायचे. लोक त्यांच्या बाजूला बसून फोटो काढायचे. तेव्हा त्यांनी कधीच कोणाला नकार दिला नाही. त्यांना पराठे खूप आवडायचे. आम्ही फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहत होतो. त्यांनी दिग्दर्शकाला पराठे मागवण्यास सांगितलं होतं. पण त्यांना पराठे खायची परवानगी नव्हती. मी त्यांना म्हणाले की मी आताच खाऊन आले. तेव्हा ते म्हणाले,'अरे, बोलायचं होतं ना... माझ्यासाठी तू चोरुन घेऊन आली असतीस. पराठे खाल्लेच पाहिजे...वर तूप टाकून खाल्ले पाहिजे.' मग आम्ही खूप हसलो."