निधनापूर्वी धर्मेंद्र यांनी पाहिला होता हा चित्रपट, आमिर खानचा खुलासा, म्हणाला - 'ती स्क्रिप्ट त्यांना...'
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 13:06 IST2025-11-28T13:05:28+5:302025-11-28T13:06:41+5:30
Aamir Khan And Dharmendra : नुकतेच ५६ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (IFFI), आमिर खानने धर्मेंद्र यांना श्रद्धांजली वाहिली आणि त्यांच्यासोबत घालवलेल्या अविस्मरणीय क्षणांना उजाळा दिला.

निधनापूर्वी धर्मेंद्र यांनी पाहिला होता हा चित्रपट, आमिर खानचा खुलासा, म्हणाला - 'ती स्क्रिप्ट त्यांना...'
बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे २४ नोव्हेंबर रोजी निधन झाले. तेव्हापासून चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. नुकतेच ५६ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (IFFI), आमिर खानने धर्मेंद्र यांना श्रद्धांजली वाहिली आणि त्यांच्यासोबत घालवलेल्या अविस्मरणीय क्षणांना उजाळा दिला. या संभाषणादरम्यान त्याने हे देखील सांगितले की, धर्मेंद्र यांनी त्यांच्या निधनापूर्वी कोणता चित्रपट पाहिला होता.
आमिर खानने खुलासा केला की, धर्मेंद्र यांनी त्यांच्या निधनापूर्वी त्यांचा मुलगा सनी देओल अभिनीत आगामी चित्रपट 'लाहौर १९४७' पाहिला होता. ५६ व्या IFFI मध्ये बोलताना आमिर खान म्हणाला की, धर्मेंद्र यांच्या निधनापूर्वी त्यांच्यासोबत काही वेळ व्यतित करण्याचे भाग्य त्याला लाभले. तो पुढे म्हणाला की, "खरंतर, सनीसोबत जो चित्रपट आम्ही बनवला 'लाहौर १९४७' तो त्यांना दाखवण्याचं भाग्य मला मिळालं. त्यामुळे त्यांनी हा चित्रपट पाहिला आहे. अर्थात, तो अजून प्रदर्शित झाला नाही आहे. पण मला खूप आनंद आहे की त्यांना हा चित्रपट पाहण्याची संधी मिळाली. कारण ती त्यांच्या आवडत्या स्क्रिप्ट्सपैकी एक होती."
या कारणामुळे धर्मेंद्र यांच्या प्रार्थना सभेला आमिर राहिला अनुपस्थित
आमिरने २७ नोव्हेंबर रोजी झालेल्या धर्मेंद्र यांच्या प्रार्थना सभेला अनुपस्थित राहण्याबद्दलही सांगितले. तो म्हणाला की, "आज, खरेतर, मी मुंबईत नाही आहे, पण दुर्दैवाने आज त्यांची प्रार्थना सभा आहे. मी ती मिस करत आहे आणि मी त्यांच्या खूप जवळ होतो कारण गेल्या एका वर्षात मी त्यांना जवळजवळ ७-८ वेळा भेटलो आहे. कारण मला त्यांची संगत खूप आवडायची, त्यामुळे मी त्यांच्याकडे जाऊन बसायचो."
त्याने तो क्षणही आठवला, जेव्हा तो त्याचा मुलगा आझादला धर्मेंद्र यांना भेटायला घेऊन गेला होता. आमिर म्हणाला, "एक दिवस मी आझादला माझ्यासोबत घेऊन गेलो, मी त्याला सांगितले की मला तुला एका व्यक्तीला भेटवायचे आहे, कारण आझादने त्यांचे काम पाहिले नव्हते. पण आझाद माझ्यासोबत आला आणि आम्ही त्यांच्यासोबत काही तास घालवले, आणि ते खरंच अप्रतिम होते. तुम्हाला माहित आहे, धरमजी फक्त एक महान अभिनेतेच नव्हते, तर एक उत्तम माणूसही होते."
'लाहौर १९४७' बद्दल
असगर वजाहत यांच्या प्रसिद्ध नाटक "जिस लाहौर नई देख्या, ओ जम्याई नी"वर आधारित हा चित्रपट फाळणीच्या काळातली कहाणी आहे. ही कहाणी एका मुस्लिम कुटुंबाभोवती फिरते, जे लखनौहून लाहोरला येऊन स्थायिक होते आणि त्यांना एका हिंदू कुटुंबाने रिकामी केलेली हवेली दिली जाते. मात्र जेव्हा त्यांना कळते की हिंदू कुटुंब अजूनही घरात राहत आहे आणि त्यांनी जाण्यास नकार दिला आहे, तेव्हा गोष्टींना नाट्यमय वळण लागते. सनी देओल आणि प्रीती झिंटासोबत, 'लाहौर १९४७' मध्ये शबाना आझमी, अली फझल आणि करण देओल यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.