"भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांनी...", धर्मेंद्र यांचा शेवटचा संदेश काय होता? 'इक्कीस'च्या टीमचा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 18:26 IST2025-12-08T18:25:35+5:302025-12-08T18:26:04+5:30
शेवटच्या क्षणापर्यंत धर्मेंद्र यांनी अभिनय सोडला नाही. 'इक्कीस' हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला. आज त्यांच्या जयंतीनिमित्त इक्कीस सिनेमाच्या टीमने त्यांचा शेवटचा व्हिडीओ शेअर केला आहे.

"भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांनी...", धर्मेंद्र यांचा शेवटचा संदेश काय होता? 'इक्कीस'च्या टीमचा खुलासा
बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांचं काही दिवसांपूर्वीच निधन झालं. आज त्यांची जयंती आहे. धर्मेंद्र आज असते तर त्यांनी ९०वा वाढदिवस साजरा केला असता. धर्मेंद्र गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर उपचार सुरू होते. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आलं होतं. अखेर २४ नोव्हेंबर रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. शेवटच्या क्षणापर्यंत धर्मेंद्र यांनी अभिनय सोडला नाही. 'इक्कीस' हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला. आज त्यांच्या जयंतीनिमित्त इक्कीस सिनेमाच्या टीमने त्यांचा शेवटचा व्हिडीओ शेअर केला आहे.
या व्हिडीओतून धर्मेंद्र यांनी 'इक्कीस' हा सिनेमा भारत-पाकिस्तान दोन्ही देशांनी पाहावा, अशी इच्छा व्यक्त केली आहे. या व्हिडीओत ते म्हणतात, "मॅडॉक फिल्मसोबत काम करून मी आनंदी आहे. दिग्दर्शक श्रीराम राघवन यांनी सिनेमा खूप छान बनवला आहे. भारत-पाकिस्तान दोन्ही देशातील लोकांनी हा सिनेमा पाहिला पाहिजे. आज सिनेमाच्या शूटिंगच्या शेवटच्या दिवशी मी आनंदीही आहे आणि दु:खीही...तुम्हा सगळ्यांना खूप सारं प्रेम. काही चुकलं असेल तर माफ करा". या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत.
धर्मेंद्र यांचा हा 'इक्कीस' सिनेमा येत्या २५ डिसेंबरला प्रदर्शित होत आहे. या सिनेमात जयदीप अहलावत, अगस्त्य नंदा, सिकंदर खेर यांच्या मुख्य भूमिका आहेत. या सिनेमाचं दिग्दर्शन श्रीराम राघवन यांनी केलं आहे. धर्मेंद्र यांचा हा शेवटचा सिनेमा पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत.