आवडतं शहर कोणतं बंगळुरू की मुंबई ? वाचा दीपिका पादुकोणनं काय दिलं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 12:58 IST2025-04-10T12:56:34+5:302025-04-10T12:58:44+5:30

दीपिकानं बंगळुरू आणि मुंबई या दोन्ही शहरांबद्दल असलेल्या भावना व्यक्त केल्यात.

Deepika Padukone Talk About Favorite City Bangalore Vs Mumbai | आवडतं शहर कोणतं बंगळुरू की मुंबई ? वाचा दीपिका पादुकोणनं काय दिलं उत्तर

आवडतं शहर कोणतं बंगळुरू की मुंबई ? वाचा दीपिका पादुकोणनं काय दिलं उत्तर

Deepika Padukone on Bangalore Vs Mumbai : बॉलिवूडची मस्तानी दीपिका पदुकोण (Deepika Padukone) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. दीपिका ही नेहमीच आपल्याला वेगवेगळ्या भूमिका साकारताना दिसते. 'ओम शांती ओम' या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण करणारी दीपिका ही मूळची बंगळुरूची आहे. तिचे आई-वडील प्रकाश आणि उज्जला पदुकोण हे बंगळुरूमध्ये राहतात. तर दीपिका पती रणवीर सिंगसोबत ( Ranveer Singh) मुंबईत राहते. पण, बंगळुरू आणि मुंबई हे दोन्ही शहर तिच्या खास जवळची आहेत.  कारण, बंगळुरूत तिचं बालपण गेलंय, तर मुंबईनं तिला ओळख दिली. या दोन्ही शहरांपैकी कोणतं शहर तिला जास्त प्रिय आहे, हे तिनं नुकतंच सांगितलं. 

दीपिकानं इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केलाय. ज्यात तिनं बंगळुरू आणि मुंबई (Bangalore Vs Mumbai) या दोन्ही शहरांबद्दल असलेल्या भावना व्यक्त केल्यात. दोन्ही शहरे तिच्या हृदयाच्या खूप जवळ असल्याचं ती म्हणाली. दीपिका म्हणाली, "मी बंगळुरूमध्ये वाढलो, माझी शाळा आणि कॉलेज झालं. म्हणूनच मी जेव्हा जेव्हा बंगळुरूमध्ये येते, तेव्हा मला घरी असल्यासारखं वाटतं.  मुंबईबद्दल बोलताना दीपिका म्हणाली, "माझे व्यावसायिक आयुष्य मुंबईतून सुरु झालं आणि आता तेच माझे घर आहे. मुंबईतील ऊर्जा खूप वेगळी आहे आणि या ठिकाणाचे सौंदर्य एक वेगळा अनुभव देतं".

दीपिकाच्या मते, मुंबई आणि बंगळुरू या दोन्ही शहरांनी गेल्या ३९ वर्षांपासून तिच्या जीवनावर वेगवेगळ्या प्रकारे प्रभाव पाडला आहे. दोन्ही शहरांचे तिच्या आयुष्यात खूप महत्त्व आहे आणि त्यांची एकमेकांशी तुलना करणे खूप कठीण आहे. १९ वर्षांपूर्वी चित्रपटसृष्टीत प्रवेश करणारी दीपिका पदुकोण आज बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. तिनं कारकिर्दीत ४० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ज्यामध्ये दक्षिण, हिंदी आणि हॉलिवूड चित्रपटांचा समावेश आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये दीपिकाने मुलगी दुआला जन्म दिला आणि सध्या ती मातृत्वाचा आनंद घेत आहे.


दीपिकाचं घर मुंबईतील प्रभादेवी परिसरात आहे. हे एक आलिशान ४ बीएचके अपार्टमेंट आहे, जे ३३ मजली टॉवरच्या २६ व्या मजल्यावर आहे. तिच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर दीपिका आणि रणवीर हे शेवटचे रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन'मध्ये एकत्र दिसले होते. या चित्रपटात दीपिकाने लेडी सिंघमची भूमिका साकारली होती, तर रणवीर सिम्बाच्या भूमिकेत दिसला होता. या चित्रपटात अजय देवगण, अर्जुन कपूर, अक्षय कुमार, करीना कपूर आणि टायगर श्रॉफ सारखे मोठे स्टार देखील दिसले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खूप चांगली कमाई केली.
 

Web Title: Deepika Padukone Talk About Favorite City Bangalore Vs Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.