दाऊदच्या गर्लफ्रेंडला नाकारणं पडलेलं महागात, निर्मात्याला गमवावा लागला होता जीव; कोण होती ती?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2023 16:44 IST2023-12-19T16:43:55+5:302023-12-19T16:44:26+5:30
अंडरवर्ल्डमधील डॉन असलेला दाऊद त्याच्या अफेअर्समुळेही चर्चेत होता. बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींचं नाव त्याच्याबरोबर जोडलं गेलं होतं.

दाऊदच्या गर्लफ्रेंडला नाकारणं पडलेलं महागात, निर्मात्याला गमवावा लागला होता जीव; कोण होती ती?
१९९३मधील मुंबईत झालेल्या भीषण बॉम्बस्फोटाचा सूत्रधार आणि कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमवर विषप्रयोग झाल्याची माहिती समोर आली आहे. दाऊदवर पाकिस्तानातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामुळे दाऊद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अंडरवर्ल्डमधील डॉन असलेला दाऊद त्याच्या अफेअर्समुळेही चर्चेत होता. बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींचं नाव त्याच्याबरोबर जोडलं गेलं होतं. त्यातीलच एक म्हणजे अनिता आयूब.
९०च्या दशकात अनिताने तिच्या सौंदर्याने सर्वांनाच भुरळ घातली होती. पाकिस्तानी अभिनेत्री असलेल्या अनिताने १९९३ साली देव आनंद यांच्या 'प्यार का तराणा'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर 'गँगस्टर' या सिनेमातही ती झळकली होती. याच दरम्यान अनिता डॉन दाऊद इब्राहिमला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. पण, अभिनेत्रीने यात कोणतंही तथ्य नसल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर घडलेल्या एका घटनेने मात्र संपूर्ण बॉलिवूड हादरून गेलं होतं.
१९९५ साली दाऊदच्या गँगकडून चित्रपट निर्माते जावेद सिद्दीकी यांची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली होती. सिद्दीकी यांनी त्यांच्या चित्रपटात अनिताला काम दिल्यामुळे त्यांना धडा शिकवण्यासाठी दाऊदने त्यांची हत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. त्यानंतर अनिता आणि दाऊद यांच्या अफेअरच्या चर्चांना पुन्हा उधाण आलं होतं. या घटनेनंतर मात्र अनिताने भारतातून आपलं बस्तान बांधलं आणि ती पाकिस्तानात परतली.
अनिताने ९०च्या दशकात भारतीय व्यावसायिक सौमिल पटेल यांच्याशी विवाह करून संसार थाटला होता. लग्नानंतर ती न्यूयॉर्कमध्ये राहत होती. पण, लग्नानंतर काहीच वर्षांत घटस्फोट घेत ते वेगळे झाले. त्यांना एक मुलगाही होता. त्यानंतर अनिताने पाकिस्तानी उद्योगपती सुबक मजीद याच्याशी लग्नगाठ बांधली होती.