"मला कोणत्याही पुरुषाची गरज नाही" बॉलिवूड अभिनेत्री लग्नाबद्दल म्हणाली "सध्याची नाती पाहता मला..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 15:31 IST2025-08-22T15:31:31+5:302025-08-22T15:31:40+5:30
अभिनेत्रीनं तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मोठी माहिती शेअर केली आहे.

"मला कोणत्याही पुरुषाची गरज नाही" बॉलिवूड अभिनेत्री लग्नाबद्दल म्हणाली "सध्याची नाती पाहता मला..."
बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी करिअरला प्राधान्य देत अद्याप लग्न केलेलं नाही. त्यापैकीच एक म्हणजे प्रसिद्ध अभिनेत्री डेझी शाह. डेझी ही आता ४० वर्षांची झाली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने लग्न आणि कुटुंबाकडून येणाऱ्या दबावावर मनमोकळेपणाने भाष्य केलं. तसेच तिनं तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल एक मोठी माहिती शेअर केली आहे. ४० वर्षीय डेझीने काही वर्षांपूर्वी बीजांड गोठवून (Eggs Freeze) घेतले आहेत.
डेझी शाह हिनं 'हॉटरफ्लाय'ला दिलेल्या मुलाखतीत वैयक्तिक आयुष्यावर भाष्य केलं. ती म्हणाली, "माझ्या वडिलांच्या निधनानंतर कुटुंबातील पुरुष सदस्य म्हणून मी स्वतःलाच मानते. माझ्या कुटुंबात जो कोणी पुरुष आला, त्याला वाटले की तोच आमच्या कुटुंबाचा आधार आहे. माझ्या बहिणीच्या पतीलाही नेहमीच असं वाटायचं की तोच एकमेव पुरुष आहे, जो आमच्या कुटुंबाचे सर्व निर्णय घेईल. पण माझ्या मनात कायम विचार होता की मीच माझ्या कुटुंबातील पुरुष आहे".
डेझीने पुढे सांगितलं, "माझ्या वडिलांच्या निधनानंतर माझ्यावर लग्नासाठी खूप दबाव होता. माझी आई आणि बहिणीकडून सतत 'लग्न कर, लग्न कर' असा आग्रह होत होता. मात्र, माझे मोठे वडील (काका) जे आता हयात नाहीयेत, ते नेहमी माझ्या बाजूने उभे राहायचे. 'मुलगी स्वतंत्र आहे, सेटल आहे, तिला अजून किती सेटल करायची गरज आहे? मुलगा आल्यानंतरच ती सेटल होईल का?’ असं ते म्हणायचे. त्यांच्या या विचारांमुळेच माझ्यावर लग्नासाठी दबाव आणण्याची कोणाची हिम्मत झाली नाही".
अभिनेत्रीने सांगितले की, आता तिची आई सुद्धा लग्नाचा विषय काढत नाही. डेझी म्हणाली, "आज माझी आई मला म्हणते, तुला लग्न करायचं असेल तर कर, नाहीतर काही हरकत नाही. पण, मला सध्याची नाती पाहून लग्न करण्याची अजिबात इच्छा नाही. माझं जीवन सुरक्षित आहे. मला आर्थिकदृष्ट्या पूर्ण होण्यासाठी कोणत्याही पुरुषाची गरज नाही, कारण मी स्वतः खूप श्रीमंत आहे". भविष्याचा विचार करून डेझीने आपल्या मैत्रिणीच्या सल्ल्याने अंडी गोठवून ठेवण्याचा निर्णय घेतला. याबाबत बोलताना ती म्हणाली, "भविष्यात मला मुलं हवी असतील तर हा पर्याय उत्तम आहे. लग्न केलेलं नसलं, तरी तुमचा वारसा पुढे न्यायचा असेल तर Egg Freezing करणं चुकीचं नाही".