राज कपूर यांच्या एका लोकप्रिय चित्रपटाचा सलमान खानच्या 'भारत'शी आहे हे कनेक्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2019 15:34 IST2019-05-07T15:34:14+5:302019-05-07T15:34:53+5:30
ईदच्या मुहूर्तावर येत्या ५ जूनला भारत सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

राज कपूर यांच्या एका लोकप्रिय चित्रपटाचा सलमान खानच्या 'भारत'शी आहे हे कनेक्शन
जागतिक पातळीवर रशियन सर्कस श्रेष्ठ मानली जाते. दिवंगत अभिनेते राज कपूर यांच्या 'मेरा नाम जोकर' चित्रपटात रशियन सर्कस रसिकांना पहायला मिळाली होती. या चित्रपटाने सर्कशीचे अंतरंग रूपेरी पडद्यावर उलगडून दाखवताना 'दुनिया एक सर्कस है' हे रसिकांच्या मनावर ठळकपणे बिंबवले होते. आता पुन्हा एकदा रसिकांना रशियन सर्कस रुपेरी पडद्यावर अनुभवायला मिळणार आहे आणि तेही दबंग खान सलमानचा आगामी चित्रपट भारतमधून.
भारत चित्रपटात ग्रेट रशियन सर्कस पहायला मिळणार असल्याचे सर्वांना ट्रेलरमधून पहायला मिळाले. नुकतेच या चित्रपटातील सर्कसचे पडद्यामागचे सीन व तयारीचा मेकिंग व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यात त्यांनी चित्रपटात सर्कसचे सीन कशापद्धतीने साकारले आहेत, हे पहायला मिळत आहे.
अली अब्बास जफर दिग्दर्शित 'भारत' सिनेमातील सर्कस सीक्वन्स साठच्या दशकातील दाखवण्यात आला आहे. याबाबत अली यांनी सांगितले की,' राज कपूर यांचा मेरा नाम जोकर या चित्रपटाप्रमाणे ग्रेट रशियन सर्कस पाहायला मिळणार आहे. यात सर्कसमधील सर्व स्टंट्स दाखवले जाणार आहेत. हा सलमान व दिशाचा इंट्रोडक्शन सीन असणार आहे. तसेच यात सलमान मोटरसायकलवर साहसी स्टंट करताना दिसेल तर दिशा ट्रॅपेजी आर्टिस्ट म्हणून दिसणार आहे.'
भारतमध्ये सलमान खान, दिशासह कतरीना कैफ, जॅकी श्रॉफ, नोरा फतेही, सुनील ग्रोव्हर आणि तब्बू अशी कलाकारांची तगडी फौज आहे. सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा अली अब्बास जाफरने सांभाळली आहे. भारत सिनेमात अॅक्शन, रोमान्स आणि देशभक्ती पाहायला मिळणार आहे आणि चार टप्प्यात या सिनेमाची कथा उलगडण्यात येणार आहे.
हा सिनेमा हिंदीशिवाय, तमिळ, तेलगू आणि मल्याळम भाषेत रिलीज होणार आहे.
मेकर्सना हा सिनेमा लिमिटेड ऑडियन्सपर्यंत मर्यादित ठेवायचा नसल्यामुळे या चित्रपटाला अन्य भाषांमध्ये सुद्धा रिलीज करण्यात येणार आहे.
ईदच्या मुहूर्तावर येत्या ५ जूनला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.