"आम्हाला प्रचंड धक्का बसला असून.."; कॅनडातील कॅफेवर गोळीबार झाल्यावर कपिल शर्माची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 10:26 IST2025-07-11T10:25:58+5:302025-07-11T10:26:45+5:30
कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार झाल्यावर अभिनेत्याला प्रचंड धक्का बसला आहे. त्याने सोशल मीडियावर अधिकृत स्टेटमेंट जारी केलं आहे

"आम्हाला प्रचंड धक्का बसला असून.."; कॅनडातील कॅफेवर गोळीबार झाल्यावर कपिल शर्माची प्रतिक्रिया
कपिल शर्मा हा लोकप्रिय कॉमेडियन आणि अभिनेता. कपिल शर्माच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. कारण कपिलने कॅनडामध्ये जो कॅफे उघडला होता त्याच्यावर गोळीबार करण्यात आला. कपिल आणि त्याची पत्नी गिन्नी या दोघांनी मिळून कॅनडामध्ये 'Kaps Cafe' नावाचं एक छानसं रेस्टॉरंट सुरू केलं आहे. गेल्याच आठवड्यात याचं ग्रँड ओपनिंग करण्यात आलं. त्यानंतर ही गोळीबाराची घटना घडल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. ही धक्कादायक घटना घडल्यानंतर कपिल शर्माच्या टीमने अधिकृत स्टेटमेंट जारी केलंय.
कपिल शर्माच्या टीमचं अधिकृत स्टेटमेंट
कपिल शर्माच्या टीमने याविषयी अधिकृत स्टेटमेंट जारी केलं. यात त्यांनी लिहिलंय की, "ग्राहकांना स्वादिष्ट कॉफी देण्यासाठी आणि मैत्रीपूर्ण भावनेने सर्वांना एकत्र आणण्यासाठी आम्ही हा कॅफे सुरु केला. आम्ही जे स्वप्न पाहिलं त्या गोष्टीला हिंसाचाराला सामोरं जावं लागलं, हे दुर्दैवी आहे. आम्ही या धक्क्यातून सावरत आहोत, पण आम्ही हार मानणार नाही. तुम्ही आम्हाला जो पाठिंबा दिलाय त्याबद्दल धन्यवाद. तुम्ही या कठीण काळात आम्हाला DM द्वारे जे मेसेज केले आहेत, ज्या प्रार्थना केल्या आहेत त्यासाठी आम्ही तुमचे आभार मानतो."
"तुम्ही सर्व आमच्यासाठी एकत्र आला आहात, यामुळेच हा कॅफे तुमच्या विश्वासावर उभा आहे. चला हिंसाचाराच्या विरोधात उभे राहूया. आमचं कॅफे लोकांना एकत्र आणतं, याची खात्री पुन्हा एकदा सर्वांना देऊया. लवकरच भेटूया!" अशा शब्दात कपिल शर्मा आणि कॅप्स कॅफेच्या टीमने त्यांचं अधिकृत स्टेटमेंट जारी केलंय. अशाप्रकारे कॅफेवर गोळीबार झाल्याने कपिल शर्मा आणि त्याच्या संपूर्ण टीमला धक्का बसला असला तरीही या धक्क्यातून ते लवकरच पुन्हा सावरतील, असा निर्धार त्यांनी दिलाय.
कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार केला?
कपिल शर्माचा कॅप्स कॅफे बऱ्याच काळापासून चर्चेत आहे, त्याने आणि त्याची पत्नी गिन्नीने कॅफेचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. परंतु, कॅफेमध्ये गोळीबाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यापासून, या घटनेने सर्वांना हादरवून सोडले आहे. मात्र, या गोळीबारात कोणत्याही व्यक्तीला दुखापत झालेली नाही. खलिस्तानी दहशतवादी हरजीत सिंग लड्डीने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे आणि कपिलला आणखी वाईट परिणामांची धमकीही दिली आहे.