वर्षभरापासून सेलिनाचा भाऊ दुबईच्या तुरुंगात कैद, भारत सरकारकडे मागितली मदत; प्रकरण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 11:34 IST2025-11-04T11:33:53+5:302025-11-04T11:34:32+5:30
सेलिनाचा भाऊ रिटायर्ड आर्मी ऑफिसर आहे. युएईने त्याच्यावर नक्की काय आरोप केला? वाचा

वर्षभरापासून सेलिनाचा भाऊ दुबईच्या तुरुंगात कैद, भारत सरकारकडे मागितली मदत; प्रकरण काय?
एकेकाळी बॉलिवूडमध्ये लोकप्रिय असलेली अभिनेत्री सेलिना जेटली अचानक चर्चेत आली आहे. सेलिनाचा भाऊ सेवानिवृत्त भारतीय सेना अधिकारी विक्रांत कुमार जेटली गेल्या एका वर्षापासून दुबईतील तुरुंगात कैद आहे. भावाच्या सुटकेसाठी सेलिनाने दिल्ली उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. अखेर न्यायालयाने तिची बाजू ऐकून तिच्या मदतीसाठी परराष्ट्र मंत्रालयाला सूचना केल्या आहेत. मात्र सेलिनाचा भावाला दुबईतील तुरुंगात का डांबण्यात आले? नक्की प्रकरण काय वाचा
सेलिना जेटलीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. यात तिने दिल्ली उच्च न्यायालयाचे आभार मानले आहेत. आपल्या भावाच्या सुटकेसाठी तिने भारत सरकारची मदत मागितली आहे. तिच्या याचिकेवर सुनावणी देताना उच्च न्यायालयाने परराष्ट्र मंत्रालयाला सेलिनाची पूर्ण मदत करण्याची सूचना दिली आहे. तसंच विक्रांत जेटली यांच्याबद्दल प्रत्येक अपडेट आणि त्यांचं हेल्थ रिपोर्ट दिल्ली कोर्टासमोर सादर करण्यास सांगितलं आहे. या केससाठी नोडल अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात यावी. जेटली यांच्याबद्दल त्यांच्या पत्नी, बहीण आणि संपूर्ण कुटुंबाला माहिती द्यावी असंही कोर्टाने नमूद केलं आहे.
नक्की प्रकरण काय?
भारतीय सेनेतून सेवानिवृत्त झाल्यानंतर विक्रांत कुमार जेटली हे पत्नीसह दुबई येथे शिफ्ट झाले होते. २०१६ सालीच ते दुबईत आले. तिथे ते एका कंसल्टन्सी फर्ममध्ये कामही करत होते. गेल्या वर्षी जेटली आपल्या पत्नीसह दुबईतील मॉलमध्ये फिरत होते तेव्हा युएई पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. त्यांनी राष्ट्रीय सुरक्षासंबंधी कायद्याचा भंग केल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला होता. गेल्या १४ महिन्यापासून त्यांना दुबईतील तुरुंगात कैद केले आहे.
तू आमच्यासाठी लढलास, आता तुझ्यासाठी उभं राहण्याची ही आमची वेळ आहे. १ वर्षापासून मी उत्तरं शोधत होते. पण आता भारत सरकार आपल्यासाठी लढेल अशी मी आशा करते, असं सेलिनाने पोस्टमध्ये म्हटलं आहे.