Video: भूमिका जगणं यालाच म्हणतात! 'छावा'साठी विकीने घेतलेली मेहनत पाहून व्हाल थक्क, BTS व्हिडीओ समोर
By देवेंद्र जाधव | Updated: February 18, 2025 16:10 IST2025-02-18T16:07:42+5:302025-02-18T16:10:09+5:30
'छावा' सिनेमाच्या पडद्यामागील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. यामध्ये विकी आणि सर्व कलाकारांनी किती मेहनत घेतली याचा अंदाज येईल (chhaava, vicky kaushal)

Video: भूमिका जगणं यालाच म्हणतात! 'छावा'साठी विकीने घेतलेली मेहनत पाहून व्हाल थक्क, BTS व्हिडीओ समोर
सध्या 'छावा' (chhaava movie) सिनेमाची चांगलीच उत्सुकता आहे. छत्रपती संभाजी महाराजांची शोर्यगाथा या सिनेमाद्वारे मोठ्या पडद्यावर झळकत आहे. 'छावा' सिनेमाला देशभरातून तुफान प्रतिसाद मिळतोय. इतकंच नव्हे 'छावा' सिनेमा पाहायला गेलेले प्रेक्षक सुन्न आणि भावुक अंतःकरणाने थिएटरबाहेर पडत आहेत. 'छावा' सिनेमा २ तास ४० मिनिटांचा असला तरी सिनेमा घडवण्यामागे पडद्यामागे बरेच कलाकार आणि तंत्रज्ञ शूटिंगच्या संपूर्ण दिवसांमध्ये मेहनत घेताना दिसत आहेत. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही विकी (vicky kaushal) आणि इतर सर्व कलाकारांच्या मेहनतीला सलाम कराल.
मेकिंग ऑफ 'छावा'
मॅडॉक फिल्मने 'छावा' सिनेमाच्या मेकिंगचा व्हिडीओ शेअर केलाय. यात सुरुवातीला 'छावा'मधील युद्धप्रसंगांसाठी विकी आणि इतर कलाकार तयारी करताना दिसतात. पुढे 'छावा'मध्ये क्लायमॅक्सला छत्रपती संभाजी महाराजांना कैद झालेली दिसते. ही कैद शूट कशी झाली याची झलक व्हिडीओत पाहायला मिळते. पुढे विकीची मुलाखत बघायला मिळते. यामध्ये विकी सांगतो की, शूटिंगला सुरुवात होण्यापूर्वी ६ ते ८ तासांचं फक्त ट्रेनिंग सेशन असायचे. यामध्ये घोडेस्वारी, तलवारबाजी, युद्धप्रसंगाचं अॅक्शन सीक्वेन्सची सर्वजण तयारी करायचे.
विकीने प्रत्येक सीन परफेक्ट व्हावा यासाठी पडद्यामागे किती मेहनत घेतली आहे, याचा अंदाज मेकिंग व्हिडीओ पाहून पाहायला मिळतो. राज्याभिषेक प्रसंग शूट कसा झाला, बुऱ्हाणपूर लुट प्रसंगाच्या वेळेस सर्व कलाकारांनी कशी मेहनत केली याशिवाय शेवटचा सीन शूट करताना विकीने साखळदंड घेऊन कसा सराव केला, याची झलक दिसते. अशाप्रकारे 'छावा'च्या शूटिंगवेळी कलाकारांनी किती मेहनत घेतली, हे दिसून येतं. 'छावा' सिनेमा १४ फेब्रुवारी २०२५ ला रिलीज झाला असून सिनेमाने ४ दिवसांमध्ये १२० कोटींहून अधिकची कमाई केलीय.