Box office Collection: 'बॉर्डर 2' कडे प्रेक्षकांची पाठ? 18 व्या दिवशी सिनेमाच्या कमाईत घट
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 09:25 IST2026-02-10T09:23:00+5:302026-02-10T09:25:15+5:30
border 2: तिसऱ्या आठवड्यात सिनेमाच्या कमाईचा ओघ कमी झाला आहे. रिलीजच्या 18 व्या दिवशी या सिनेमाने जेमतेम कमाई केली आहे.

Box office Collection: 'बॉर्डर 2' कडे प्रेक्षकांची पाठ? 18 व्या दिवशी सिनेमाच्या कमाईत घट
अनुराग सिंह दिग्दर्शित 'बॉर्डर 2' हा सिनेमा पहिल्या दिवसापासून बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड करत आहे. 23 जानेवारीला रिलीज झालेला हा सिनेमा प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून घेतला. मात्र, आता कुठे तरी या सिनेमाची क्रेझ कमी होतांना दिसत आहे. या आठवड्यात सिनेमाच्या कमाईत घट झाली आहे.
सिनेमा रिलीज झाल्यानंतर पहिल्याच आठवड्यात या सिनेमाने बक्कळ कमाई केली. मात्र, तिसऱ्या आठवड्यात सिनेमाच्या कमाईचा ओघ कमी झाला आहे. रिलीजच्या 18 व्या दिवशी या सिनेमाने जेमतेम कमाई केली आहे.
'बॉर्डर 2' रिलीज झाल्यानंतर अवघ्या तीन दिवसामध्ये या सिनेमाने सव्वा कोटींपेक्षा जास्त कमाई केली. त्यामुळे हा सिनेमा लवकरच ५०० कोटींचा आकडा पार करेल असा अंदाज वर्तविला जात होता. मात्र, गेल्या काही दिवसातील प्रेक्षकांचा ओघ पाहता हा सिनेमा आता ४०० कोटींचा टप्पा तरी गाठेल की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे.
'सॅकनिल्क'च्या रिपोर्टनुसार, तिसऱ्या सोमवारी 'बॉर्डर 2' ने बॉक्स ऑफिसवर 2 कोटींची कमाई केली. आतापर्यंतच्या कमाईमध्ये हा आकडा सर्वात कमी असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे या सिनेमाची आतापर्यंतची एकूण कमाई ही 343 कोटी रुपये इतकी झाली आहे.
दरम्यान, या सनी देओलची मुख्य भूमिका असलेला 'बॉर्डर 2' हा सिनेमा प्रचंड लोकप्रिय ठरला आहे. विशेष म्हणजे या सिनेमात वरुण धवन, दलजीत दोसांझ, आहान शेट्टी, मोना सिंग ही कलाकार मंडळी झळकली आहेत.