Border 2: हातात बंदूक अन् चेहऱ्यावर अंगार! 'बॉर्डर २'मधला वरुण धवनचा फौजी लूक समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 12:03 IST2025-11-05T12:00:47+5:302025-11-05T12:03:21+5:30
बॉलिवूड अभिनेता वरुण धवनचीही 'बॉर्डर २'मध्ये वर्णी लागली आहे. आता वरुणचा या सिनेमातील फर्स्ट लूक समोर आला आहे.

Border 2: हातात बंदूक अन् चेहऱ्यावर अंगार! 'बॉर्डर २'मधला वरुण धवनचा फौजी लूक समोर
'बॉर्डर २' सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. १९९७ साली प्रदर्शित झालेल्या 'बॉर्डर' या सिनेमाने रेकॉर्डब्रेक कामगिरी केली होती. देशभक्तीची भावना जागृत करणाऱ्या या सिनेमाने चाहत्यांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली. त्यामुळेच 'बॉर्डर २'ची घोषणा झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमासाठी उत्सुक आहेत. या सिनेमात अनेक नवे चेहरे दिसणार आहेत. बॉलिवूड अभिनेता वरुण धवनचीही 'बॉर्डर २'मध्ये वर्णी लागली आहे. आता वरुणचा या सिनेमातील फर्स्ट लूक समोर आला आहे.
वरुण धवनने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन 'बॉर्डर २' सिनेमातील त्याच्या लूकचं पहिलं पोस्टर शेअर केलं आहे. या पोस्टरवर वरुण धवन सैनिकाच्या लूकमध्ये दिसत आहे. हातात बंदूक असलेल्या वरुण धवनच्या चेहऱ्यावर अंगार पाहायला मिळत आहे. आजूबाजूला युद्धजन्य परिस्थिती असल्याचं पोस्टरवर दिसत आहे. 'बॉर्डर २'मध्ये वरुण धवन सैनिक होशियार सिंग दहिया ही भूमिका साकारताना दिसणार आहे. "देश का फौजी होशियार सिंग दहिया", असं कॅप्शन त्याने या फोटोला दिलं आहे. वरुण धवनचा 'बॉर्डर २'मधील लूक पाहून चाहत्यांच्या अपेक्षा आणखीनच वाढल्या आहेत.
'बॉर्डर २' सिनेमात वरुण धवनसोबत सनी देओल, दिलजीत दोसांझ, अहान शेट्टी, सोनम बाजवा, मोना सिंग, मेधा राना यांच्या मुख्य भूमिका आहेत. अनुराग सिंग या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहे. २३ जानेवारी २०२६ रोजी 'बॉर्डर २' सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.