Border 2: 'बॉर्डर २'ची हवा! रिलीजआधीच ॲडव्हान्स बुकींमध्ये सिनेमाने केली 'इतक्या' कोटींची कमाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 16:25 IST2026-01-20T16:16:45+5:302026-01-20T16:25:09+5:30
'बॉर्डर २' सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकींगला सुरुवात झाली आहे. अॅडव्हान्स बुकींगमध्येच सिनेमाने विक्रमी कामगिरी केली आहे

Border 2: 'बॉर्डर २'ची हवा! रिलीजआधीच ॲडव्हान्स बुकींमध्ये सिनेमाने केली 'इतक्या' कोटींची कमाई
सनी देओलचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'बॉर्डर २' प्रदर्शित होण्यापूर्वीच बॉक्स ऑफिसवर नवनवीन विक्रम प्रस्थापित करत आहे. चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगला सुरुवात होताच प्रेक्षकांनी तिकीट खिडकीवर प्रचंड गर्दी केली असून, पहिल्या २४ तासांतच या चित्रपटाने तिकीट विक्रीच्या बाबतीत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. त्यामुळे 'बॉर्डर २'ला रिलीजआधीच मोठा फायदा झाला आहे.
विशेष म्हणजे, 'बॉर्डर २' ने केवळ २४ तासांच्या ॲडव्हान्स बुकिंगमध्ये सनी देओलचा यापूर्वीचा चित्रपट 'जाट'च्या संपूर्ण कमाईच्या आकड्याला मागे टाकले आहे. यामुळे सनी देओलच्या 'बॉर्डर' या फ्रँचायझीबद्दल प्रेक्षकांमध्ये असलेली क्रेझ पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. रिलीजआधीच 'बॉर्डर २' सिनेमाने ३ कोटींची कमाई केली आहे.
या चित्रपटाने केवळ 'जाट'च नव्हे, तर सनी देओलचा ब्लॉकबस्टर चित्रपट 'गदर २' आणि अलीकडेच चर्चेत असलेल्या रणवीर सिंहच्या 'धुरंधर' चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगचा वेगही मागे टाकला आहे. ट्रेड ॲनालिस्टच्या मते, ज्या वेगाने तिकिटांची विक्री होत आहे, ते पाहता हा चित्रपट पहिल्या दिवशी ऐतिहासिक कमाई करण्याची शक्यता आहे.
१९९७ मध्ये आलेल्या 'बॉर्डर' चित्रपटाचा हा सिक्वल २३ वर्षांनंतर येत आहे. यामध्ये सनी देओल पुन्हा एकदा 'तारा सिंग' नंतर आपल्या दमदार फौजी अवतारात दिसणार आहे. या चित्रपटात सनी देओलसोबत वरुण धवन, दिलजीत दोसांझ आणि अहान शेट्टी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. अनुराग सिंग यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला हा चित्रपट देशभक्ती आणि युद्धाच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे.
चित्रपटाची ही आकडेवारी पाहता, 'बॉर्डर २' बॉक्स ऑफिसवर केवळ सनी देओलच्या करिअरमधीलच नव्हे, तर बॉलिवूडमधील सर्वात मोठ्या ओपनिंग फिल्म्सपैकी एक ठरू शकते. चित्रपट प्रदर्शित व्हायला अजून काही दिवस बाकी असताना, ही ॲडव्हान्स बुकिंगची लाट कुठे जाऊन थांबते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.