या अभिनेत्रीवर असा काही भाळला की चक्क भारतात पळून आला...! वाचा, बॉब क्रिस्टो नावाच्या हिरोची कथा!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2020 14:32 IST2020-05-12T14:30:58+5:302020-05-12T14:32:57+5:30
हा बॉब मुळचा ऑस्ट्रेलियाचा. ऑस्ट्रेलियात सिडनी येथे त्याचा जन्म झाला. मग तो बॉलिवूडमध्ये कसा आला तर एका अभिनेत्रीसाठी...

या अभिनेत्रीवर असा काही भाळला की चक्क भारतात पळून आला...! वाचा, बॉब क्रिस्टो नावाच्या हिरोची कथा!!
एक इंग्रज जो, 80-90 च्या दशकातील प्रत्येक हिंदी सिनेमात हिरोशी फाईटींग करताना दिसायचा, तो आठवतो? ‘मिस्टर इंडिया’मध्ये अडखळत ‘सॉरी बजरंगबली’ म्हणणारा तो इंग्रज कलेक्टर आठवतो? या अभिनेत्याचे नाव आहे बॉब क्रिस्टो. या बॉबला बॉलिवूडमध्ये पहिला ब्रेक दिला होता तो अभिनेता संजय खान यांनी. त्याचा पहिला सिनेमा होता, ‘अब्दुल्ला’. 1980 साली संजय व जीनत अमान यांच्या या सिनेमात बॉब जादुगाराच्या रोलमध्ये दिसला होता, त्याचा दुसरा सिनेमा होता, फिरोज खानसोबतचा ब्लॉकबस्टर ‘कुर्बानी’. या हिट सिनेमानंतर या बॉबने 200 पेक्षा अधिक सिनेमात काम केले. गँगस्टर, इंग्रज अधिकारी, गुड, भ्रष्ट पोलिस अधिकारी, दरोडेखोर, सुपारी किलर अशा अनेक भूमिका त्याने साकारल्या.
आज याच बॉबबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, तर हा बॉब मुळचा ऑस्ट्रेलियाचा. ऑस्ट्रेलियात सिडनी येथे त्याचा जन्म झाला. मग तो बॉलिवूडमध्ये कसा आला तर परवीन बाबीसाठी...
होय, हा किस्सा चांगलाच रंजक आहे. बॉब सहा वर्षांचा असताना त्याच्या वडिलांनी त्याला जर्मनीला आजीकडे सोडले. जर्मनी दुस-या महायुद्धाच्या झळा सोसत असताना चिमुकला बॉब जर्मनीत आपल्या आजी व आत्यासोबत राहू लागला. पुढे येथेच थिएटरमध्ये काम करू लागला. येथे त्याची भेट हेल्गासोबत झाली. ही हेल्गा पुढे बॉबची पत्नी झाली. हेल्गापासून त्याला ३ मुले झाली. मात्र एका अपघातात हेल्गाचा दुदैर्वी मृत्यू झाला. तिच्या मृत्यूनंतर आपल्या दोन्ही मुलांना एका अमेरिकन कपलला सोपवून बॉब एका लष्करी कारवाईवर व्हिएतनामला गेला.
मधल्या काळात बॉबने दुसरे लग्न केले. या दुस-या पत्नीपासून त्याला एक मुलगा झाला.
तर मग बॉब भारतात कसा आला? तर एकदा एका मॅगझिनच्या कव्हरवर त्याने परवीन बाबीचा फोटो पाहिला. तो फोटो पाहून बॉब परवीनचा इतका मोठा फॅन बनला की, तिला भेटायचेच या एका ध्यासाने त्याला झपाटले. मग काय, परवीनच्या भेटायचे या एकाच जिद्दीने तो भारतात आला. बॉब परवीन बाबीचा चाहता होता तसाच त्याला समुद्रही खूप आवडायचा. त्यामुळे मुंबईत उतरल्यानंतर पहिल्यांदा त्याची पावले वळली ती जुहू बिचकडे. तिथून चर्चगेटकडे जात असताना योगायोगाने एका फिल्म युनिटशी बॉबची गाठ पडली. बॉब त्यांच्याशी गप्पा करू लागला. या गप्पांच्या ओघात युनिटमधील कॅमेरामॅन दुस-या दिवशी ‘द बर्निंग ट्रेन’च्या सेटवर परवीन बॉबीला भेटणार असल्याचे कळले. मग काय दुस-या दिवशी बॉब परवीन बॉबीला भेटण्यासाठी कॅमेरामॅनसोबत द बर्निंग ट्रेन चित्रपटाच्या सेटवर पोहोचला.
तो कॅमेरामॅनला परवीन बॉबीशी भेट घालून देण्याची विनंती करत होता तेवढ्यात पाठीमागून कोणत्यातरी मुलीने आवाज दिला. बॉबने मागे वळून पाहिले तर परवीन बॉबी उभी होती. बॉब तिच्याजवळ गेला. ती साक्षात परवीन बाबी होती. पण बॉब ती परवीन बाबी आहे, हे मानायला तयार नव्हता. तू परवीन बॉबी नाहीच, असे म्हणत त्याने त्या मॅगझीनचे कव्हर पेज पुढे केले. हे बघ, ही परवीन बाबी आहे़ तू ती नाहीस, असे म्हणत तो शांत झाला. त्याचे ते शब्द ऐकून परवीन बाबी जोरजोरात हसू लागली.
मी शुटींग व्यतिरिक्त मेकअप करत नाही. विना मेकअप मी काय इतकी कुरूप दिसते, असा प्रश्न तिने बॉबला केला. त्यानंतर कुठे बॉबचा विश्वास बसला. पुढे परवीन व बॉबची चांगली मैत्री झाली. इतकेच नाही तर याच परवीन बाबीसोबत काम करण्याची संधीही त्याला मिळाली.
20 मार्च 2011 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या 72 व्या वर्षी बॉबचा मृत्यू झाला.