"इथली घाण, अराजकता..." मुंबई-सत्ताधाऱ्यांवर बॉलिवूड दिग्दर्शकाची आगपाखड, कोलंबोचं कौतुक करत म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 12:22 IST2025-08-04T12:21:38+5:302025-08-04T12:22:44+5:30
कोलंबोचं कौतुक करत बॉलिवूड दिग्दर्शकानं मुंबई आणि सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली.

"इथली घाण, अराजकता..." मुंबई-सत्ताधाऱ्यांवर बॉलिवूड दिग्दर्शकाची आगपाखड, कोलंबोचं कौतुक करत म्हणाले...
Hansal Mehta Slams Mumbai: हंसल मेहता हे भारतीय सिनेमातील खूप प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत. त्यांनी अनेक चांगले चित्रपट बनवले आहेत. ते कायम चर्चेत असतात. सध्या त्याच्या सोशल मीडियावरील एका पोस्टमुळे त्यांनी सर्वांचं लक्ष वेधलं आहे. श्रीलंकेच्या कोलंबो शहरात चित्रीकरणासाठी गेलेल्या हंसल मेहतांनी तिथे अनुभवलेल्या स्वच्छतेचा आणि व्यवस्थेचा उल्लेख करत, मुंबईच्या अस्वच्छतेवर आणि अराजकतेवर सडकून टीका केली आहे.
हंसल मेहता यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वीचं ट्विटर) वर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी लिहिलं की, "मी नुकताच कोलंबोमध्ये एक मोठं शुटिंग करून परतलो आहे. हा एक असा देश आहे, जे सध्या आर्थिक संकट आणि अलीकडील राजकीय अस्थिरतेचा सामना करतंय. तरीसुद्धा, त्याची राजधानी कोलंबो ही आपल्या देशाच्या तथाकथित "आर्थिक राजधानीपेक्षा" अधिक स्वच्छ, अधिक संघटित आणि अधिक प्रतिष्ठित वाटते.
पुढे त्यांनी लिहलं, "जेव्हा जेव्हा मी मुंबईत परततो, तेव्हा इथली घाण, अराजकता, मोडकळीस आलेली पायाभूत सुविधा आणि या सगळ्याबाबत असलेली आपली सामूहिक उदासीनता पाहून मला धक्का बसतो. आपण हे सगळं "आपल्याकडे इतकी मोठी लोकसंख्या आहे" असं म्हणत समजून घेतो. हे खरं आहे. पण आपल्याकडे एक अशी लोकसंख्या देखील आहे जी खूप कमी अपेक्षा ठेवायला शिकलेली आहे, काहीही मागू नये असं सांगितलं गेलं आहे. जे खरं तर अस्वीकार्य आहे, त्यालाच सामान्य मानायला भाग पाडलं आहे".
ते लिहतात, "आपण अशा शहरात जगतो, जेथे घर घेण्यासाठी एखाद्याला आपलं संपूर्ण आयुष्य खर्ची करावं लागतं आणि आत्मा गहाण ठेवावा लागतो. त्याच्या बदल्यात काय मिळतं? कचऱ्याने भरलेले रस्ते, उघडी गटारं आणि डिझायनर ब्रँडिंगमध्ये लपवलेली नागरी उदासीनता. हे एक असं शहर आहे जे उपभोगवादाने ग्रासलेले आणि आतून पूर्णपणे रिकामं झालेलं आहे. आपण किती काळ असंच जगत राहणार आहोत? उदासीन, थकलेले आणि पराभूत... जिथे सहनशक्तीला आपण अभिमान समजतो आणि अराजकतेला 'शहराचा स्वभाव' म्हणून गौरवतो".
Just returned from a long shoot in Colombo. A country grappling with economic crisis and fairly recent political turmoil, and yet its capital is cleaner, more organised, and more dignified than the so-called financial capital of a rising superpower.
— Hansal Mehta (@mehtahansal) August 3, 2025
Every time I come back to…
पोस्टच्या शेवटी त्यांना लिहलं, "माझं आजही या शहरावर प्रेम आहे. या शहरानं मला सगळं काही दिलं आहे. पण, हे शहर सत्ताधाऱ्यांच्या हातात गुदमरत आहे. जे कधीच या शहराला मोकळा श्वास घेऊ देत नाहीत. जे कधीच या शहराला आपली काळजी घेऊ देत नाहीत. ते या शहराच्या अधोगतीतून फायदा कमावतात आणि त्यालाच "स्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता" किंवा लवचिकता म्हणून मिरवत राहतात".