दोन मुलं असूनही बोनी कपूर यांनी केलेलं श्रीदेवीला प्रपोज; अशी होती अभिनेत्रीची रिअॅक्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2024 11:51 IST2024-12-26T11:46:20+5:302024-12-26T11:51:38+5:30
"जवळपास ६ महिने ती माझ्याशी बोलत नव्हती", बोनी कपूर यांनी प्रपोज करताच श्रीदेवी यांची होती अशी प्रतिक्रिया

दोन मुलं असूनही बोनी कपूर यांनी केलेलं श्रीदेवीला प्रपोज; अशी होती अभिनेत्रीची रिअॅक्शन
Boney Kapoor :बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी (Sridevi) आणि बोनी कपूर (Boney Kapoor) यांची लव्हस्टोरी कोणत्याही फिल्मीस्टोरीपेक्षा कमी नाही. त्याकाळी श्रीदेवी- बोनी कपूर यांच्या नात्याबद्दल इंडस्ट्रीत सर्वाधिक चर्चा झाली. पहिलं लग्न झालेलं असताना बोनी कपूर श्रीदेवी यांच्या प्रेमात अकंठ बुडाले होते. बऱ्याच प्रयत्नानंतर त्यांनी श्रीदेवी यांच्यासोबत लग्न करून नव्या आयुष्याला सुरुवात केली. आज श्रीदेवी जरी आपल्यासोबत नसल्या तरी तिची आठवण मला कायम सतावत असते. असा खुलासा बोनी कपूर यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत केला आहे.
नुकतीच बोनी कपूर यांनी 'एबीपी न्यूज'सोबत खास बातचीत केली. त्यादरम्यान, त्यांनी श्रीदेवी यांना प्रपोज केल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया काय होती? याबद्दल त्यांनी सांगितलं. त्यावेळी बोनी कपूर म्हणाले, "माझं तिच्यावर खूप प्रेम होतं. मी अजूनही तिच्यावर प्रेम करतो आणि करत राहणार. तिचा होकार मिळविण्यासाठी जवळपास ५-६ वर्षे लागली होती. जेव्हा मी तिच्यासमोर माझ्या मनातील भावना व्यक्त केल्या तेव्हापासून ६ महिने तिने माझ्याशी बोलणं बंद केलं होतं."
पुढे बोनी कपूर म्हणाले, "ती मला म्हणाली की तुम्ही विवाहित आहात आणि तुम्हाला दोन मुले सुद्धा आहेत. मग तुम्ही माझ्याबरोबर असं कसं बोलू शकता? पण, तेव्हा मी तेच बोललो होतो जे माझ्या मनात होतं आणि नशीबानेही मला त्यासाठी साथ दिली."
नातं टिकवण्यासाठी समजूतदारपणा आवश्यक
पती-पत्नीच्या नात्याचं महत्व सांगताना ते म्हणाले की, "प्रत्येक सरत्या वर्षासोबत पती-पत्नीमधील नातं देखील घट्ट होत गेलं पाहिजे. दोघांमध्ये कोणत्याही गोष्टीवरून मतभेद नसावेत. त्यामुळे नाती टिकत नाहीत. कोणीही परिपूर्ण नसतं, मी देखील नव्हतो. त्यानंतर ते म्हणाले, "माझं आधीच एक लग्न झालं होतं. परंतु मी कधीही त्या गोष्टी कोणापासी लपून ठेवल्या नाहीत. त्यामुळे शेवटपर्यंत माझं आणि मोनामधील नातं मैत्रीमुळे टिकून राहिलं. आपल्या पार्टनरसाठी प्रामाणिक राहणं कायम चांगल असतं आणि अशाच पद्धतीने तुम्हाला तुमच्या पाल्यासाठी देखील प्रामाणिक राहणं गरजेचं आहे. "
"मी माझ्या मुलांसाठी त्यांचा मित्र आहे. मीच त्यांची आई आणि मीच त्यांचा वडील आहे. नाती तेव्हाच टिकतात जेव्हा तुम्ही आपल्या पार्टनरसोबत आणि मुलांसोबत कोणताही दिखावा करत नाहीत. नातं हे पारदर्शी असावं."
श्रीदेवी आणि बोनी कपूर २ जून, १९९६ ला लग्नबेडीत अडकले. २५ मार्च, २०१२ साली कर्करोगामुळे मोनाचे निधन झाले. मोना व बोनी कपूर यांना दोन मुले आहेत अर्जुन कपूर व अंशुला. श्रीदेवी यांच्या निधनानंतर बोनी कपूर त्यांच्या चारही मुलांची काळजी घेतात.