बॉलिवूड अभिनेत्री जरीन खानला फसवणुक प्रकरणात कोर्टाचा दिलासा; अटक वॉरंट रद्द
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2023 18:20 IST2023-10-10T17:33:43+5:302023-10-10T18:20:25+5:30
अभिनेत्री जरीन खानला फसवणूक प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे.

Zareen Khan
अभिनेत्री जरीन खानला मोठा दिलासा मिळाला आहे. फसवणूक प्रकरणात अभिनेत्रीविरोधात जारी करण्यात आलेले अटक वॉरंट कोलकाता मॅजिस्ट्रेटने रद्द करण्यात आले आहे. कोलकात्याच्या सियालदह कोर्टातून अभिनेत्रीविरोधात हे वॉरंट जारी करण्यात आले होते.
जरीन खानवर फसवणुकीचा आरोप करण्यात आला होता. मात्र, आता या प्रकरणातील खरे तथ्य समोर आल्यानंतर न्यायदंडाधिकाऱ्यांनी तातडीने सविस्तर आदेश जारी केला. यामध्ये जरीन खानविरोधात जारी करण्यात आलेले वॉरंट रद्द करण्यात आले आहे.
एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीने जरीन खानविरुद्ध ही तक्रार केली होती. कोलकाता येथे ती दुर्गापूजेच्या कार्यक्रमांना उपस्थित राहणार होती. मात्र ती आली नाही. त्यामुळे आयोजकाने जरीन खान आणि तिच्या मॅनेजरविरुद्ध फसवणुकीची तक्रार दाखल केली होती. आयोजकांनी चुकीची माहिती दिल्याचा आरोप यावेळी जरीनच्या टीमकडून करण्यात आला होता.
जरीनने १३ वर्षांपूर्वी कलाविश्वात पदार्पण केलं. वीर या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पाय ठेवला. तिचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा चालला नाही. मात्र, तिची तुलना कतरिना कैफसोबत होऊ लागली. जरीन बऱ्यापैकी कतरिनासारखी दिसत असल्यामुळे तिला लोक कतरिनाची कार्बन कॉपी म्हणतात. जरीन कलाविश्वात फारशी सक्रीय नाही. मात्र, सोशल मीडियावर तिचा दांडगा वावर आहे.