ना कोणता गाजावाजा, ना राजेशाही थाट! अत्यंत साधेपणात यामी-आदित्य धरने का केलेलं लग्न? अभिनेत्रीने सांगितलं खरं कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 13:19 IST2025-12-24T13:14:23+5:302025-12-24T13:19:17+5:30
फक्त २० पाहुणे अन् हिमाचल प्रदेशासारखं ठिकाणं, यामी-आदित्य धरने साधेपणात का केलं लग्न, कारण आलं समोर

ना कोणता गाजावाजा, ना राजेशाही थाट! अत्यंत साधेपणात यामी-आदित्य धरने का केलेलं लग्न? अभिनेत्रीने सांगितलं खरं कारण
Yami Gautam On Her Marriage With Aditya Dhar: सध्या धुरंधर या चित्रपटाचं नाव जगभर गाजत आहे. रणवीर सिंह, अक्षय खन्ना, अर्जुन रामपाल, संजय दत्त आणि आर. माधनव यांनी सिनेमात साकारलेल्या भूमिकांचंही कौतुक होताना दिसतंय. मात्र, ही कथा रुपेरी पडद्यावर आणणारा खरा धुरंधर दिग्दर्शक आदित्य धर देखील तितकाच चर्चेत आला आहे. या सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शनाची धुराही त्याने सांभाळली आहे. संपूर्ण जगाचं बॉलिवूडकडे लक्ष वेधून घेणाऱ्या या दिग्दर्शकाची लव्हलाईफही तितकीच इंटरेस्टिंग आहे. नुकत्याच एका मुलाखतीत आदित्यची पत्नी यामी गौतमने त्यांच्या लग्नाचा किस्सा शेअर केला आहे.
धुरंधरपूर्वी आदित्यने दिग्दर्शित केलेला 'उरी-द सर्जिकल स्ट्राईक' हा सिनेमा सुद्धा प्रचंड गाजला होता. या सिनेमात अभिनेता विकी कौशल प्रमुख भूमिकेत झळकला. विकी कौशलसह अभिनेत्री यामी गौतम देखील उरी-द सर्जिकल स्ट्राईक मुख्य पात्र साकारलं होतं. याच चित्रपटाच्या सेटवर आदित्य-यामीची भेट झाली आणि त्यांचे खऱ्या आयुष्यातही सूर जुळले. अलिकडेच ह्यूमन्स ऑफ बॉम्बेसोबतच्या संभाषणात यामी गौतम खुलासा करत म्हणाली, "आमच्यामध्ये नात्यात काही फिल्मी कथेप्रमाणे गोष्टी घडल्या नाहीत. मला त्याच्यातील साधेपणा खूप भावला.मला फक्त हेच कळत होतं की आमचं लग्न होणारच आहे. आमच्या दोन्ही कुटुंबांना आम्ही एकत्र राहावं असं वाटत होतं आणि ते खूप आनंदी होते."
लग्नाबद्दल यामी म्हणाली,जरी कोरोना महामारी नसती, तरीही तिला अशाच प्रकारे लग्न करायला आवडलं असतं." माझ्या लग्नात फक्त कुटुंबातील सदस्य असावेत आणि तो एक छोटासा, कौटुंबिक सोहळा असावा अशी माझी इच्छा होती. प्रत्येकाने आम्हाला आशीर्वाद द्यावेत आणि आपल्या सभोवताली नैसर्गिक वातावरण असावं.आम्हाला इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा चालीरीती आणि परंपरेनुसार लग्न करायचं होतं.आपल्या परंपरांबद्दल, आणि हिंदू संस्कृतीबद्दल आमच्या मनात नितांत प्रेम आहे. या प्रत्येक गोष्टीला एक अर्थ असतो."
यामी आणि आदित्य धर यांनी २०११ साली हिमाचल प्रदेशमध्ये लग्नगाठ बांधली. अत्यंत साधेपणात त्यांचा विवाहसोहळा पार पडला होता. तेव्हा कोरोनाचे निर्बंध असल्यामुळे अगदी २० लोकांच्या उपस्थितीत त्यांचं लग्न लागलं होतं. यावेळी लग्नात यामीने तिच्या आईची ३३ वर्ष जुनी सिल्क साडी परिधान केली होती.