"तो माणूस म्हणून...", लेक नताशा अन् फरदीन खानच्या वेगळे होण्याच्या निर्णयाबद्दल मुमताज पहिल्यांदाच बोलल्या, म्हणतात-"त्यांनी पुन्हा..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 18:32 IST2025-12-22T18:30:33+5:302025-12-22T18:32:59+5:30
लेक नताशा अन् फरदीन खानच्या वेगळे होण्याच्या निर्णयाबद्दल मुमताज पहिल्यांदाच बोलल्या, म्हणतात...

"तो माणूस म्हणून...", लेक नताशा अन् फरदीन खानच्या वेगळे होण्याच्या निर्णयाबद्दल मुमताज पहिल्यांदाच बोलल्या, म्हणतात-"त्यांनी पुन्हा..."
Mumtaz Reaction On daughter natasha and Fardeen khan Sepration: हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या सौंदर्याने अनेक सिनेरसिकांच्या हृदयाची धडधड वाढविणाऱ्या अनेक अभिनेत्री होवून गेल्यात. त्यांच्यातील सर्वात सुंदर अभिनेत्री मानल्या गेलेल्या, ९० च्या दशकात प्रेक्षकांच्या मनावर आपल्या सौंदर्याचे गारुड घालणाऱ्या अभिनेत्री म्हणजे मुमताज. धर्मेंद्र, राजेश खन्ना आणि दारा सिंग यांच्यासारख्या मोठ्या बॉलिवूड सुपरस्टार्ससोबत स्क्रीन शेअर करून मुमताज यांनी त्यांचे स्टारडम निर्माण केले होते. सध्या त्या चित्रपटांत दिसत नसल्या तरीही त्या त्यांच्या वक्तव्यांमुळे मोठ्या चर्चेत असतात. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मुमताज या त्यांची लेक आणि जावयाबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आल्या आहेत.
मुमताज यांची लेक नताशा हिने बॉलिवूड अभिनेता फरदीन खानसोबत 2005 लग्नगाठ बांधली. मात्र, लग्नाच्या १८ वर्षानंतर या कपलने वेगळं राहण्याचा निर्णय घेतला.
फरदीन खान मुंबईत त्याच्या आईसोबत राहतो तर नताशा लंडनमध्ये असते. नुकत्याच विक्की लालवानीला दिलेल्या मुलाखतीत मुमताज यांनी नताशा आणि फरदीनच्या या निर्णयावर भाष्य केलं आहे. त्या म्हणाल्या,"फरदीन हिरा आहे, मला आजही तो आवडतो. मी त्याच्यावर खूप प्रेम करते, कारण जेव्हा त्याचा जन्म झाला आणि त्यावेळी
आम्ही फिरोजच्या चित्रपटाचे शूटिंग करत होतो.तेव्हा मी त्याच्या नावाने शॅम्पेन प्यायले होते.तो खूपच गोड आहे."
त्यानंतर फरदीन आणि नताशा वेगळे झाल्यानंतर त्याचं नातं कसं आहे, याबद्दल खुलासा केला. त्यांनी सांगितलं, "मला तुम्हाला सांगावसं वाटतंय की,जेव्हा माझी मुलगी लंडनमध्ये आजारी होती, तेव्हा तो भारतातून तिला भेटायला तीन वेळा तिकडे आला होता. त्याच्याजागी जर दुसरा कोणी पुरुष असता त्याने येणं टाळलं असतं. पण फरदीनने तसं केलं नाही. तो तिला भेटायला लंडनमध्ये आला. यावेळी नताशाव्यतिरिक्त, फरदीन देखील आपल्या मुलांच्या खूप जवळ आहे असंही त्या म्हणाल्या. मुमताज म्हणाल्या, "मुले त्यांच्या आईसोबत राहतात, त्यामुळे जेव्हा जेव्हा त्यांना सुट्ट्या मिळतात, तेव्हा तो त्यांना फिरायला घेऊन जातो.माझी मुलगीही यासाठी आनंदाने तयार होते. तो मुलांना अगदी फुलांप्रमाणे जपतो, त्यांना सगळीकडे घेऊन जातो, कधीही नाही म्हणत नाही आणि त्यांच्यासोबत शॉपिंगलाही जातो.तो एक चांगला वडील आणि पती आहे. तो आपल्या मुलांवर खूप प्रेम करतो."
फरदीन-नताशाने एकत्र यावं...
या मुलाखतीत मुमताज यांनी असंही सांगितलं की, त्या दोघांनी पुन्हा एकत्र यावे अशी त्याची इच्छा आहे.आपल्या मनातील भावना व्यक्त करत त्या म्हणाल्या,"तो खूप चांगला माणूस आहे,तो माझ्यावर खूप प्रेम करतो आणि माझा खूप आदरही करतो.ते दोघे पुन्हा एकत्र यावेत यासाठी मी आजही देवाला प्रार्थना करते.पण नशिबात काय लिहिले आहे हे कोणाला ठाऊक? त्याने अजूनही दुसऱ्या कोणाशीही लग्न केलेले नाही.त्या दोघांनाही स्वतः विचार यावर तोडगा काढला पाहिजे. मी यावर काही बोलू शकत नाही, ना मी त्यांच्यावर दबाव आणू शकते; ते दोघेही समजूतदार आहेत."