लग्नाचा वाढदिवस अन् नवऱ्याने दिले घटस्फोटाचे पेपर्स, अभिनेत्रीला पोटच्या लेकारांनाही भेटता येईना, दु:ख व्यक्त करत म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 11:17 IST2026-01-14T11:12:58+5:302026-01-14T11:17:10+5:30
१४ वर्ष संसार करुनही पतीने दिला दगा! लग्नाच्या वाढदिवशी दिला जबर धक्का, बॉलिवूड अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

लग्नाचा वाढदिवस अन् नवऱ्याने दिले घटस्फोटाचे पेपर्स, अभिनेत्रीला पोटच्या लेकारांनाही भेटता येईना, दु:ख व्यक्त करत म्हणाली...
Celina Jaitley Post: बॉलिवूड अभिनेत्री, माजी मिस इंडिया सेलिना जेटली सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. सेलिनाने तिचा ऑस्ट्रेलियन पती पीटर हागच्या विरोधात घरगुती हिंसाचाराचा खटला दाखल केला असून त्याच्यासोबत घटस्फोट देत आहे.यासंदर्भात तिने मुंबई न्यायालयात धाव घेतली आहे.या जोडप्याला विन्स्टन, विराज आणि आर्थर अशी तीन मुले आहेत. ते सध्या पीटर हागसोबत ऑस्ट्रियामध्ये आहेत. मात्र, आपल्या पोटच्या मुलांनाही तिला भेटता येत नाही. अशातच या तणावपूर्ण परिस्थितीवर भाष्य करणारी भलीमोठी पोस्ट तिने सोशल मीडियावर शेअर केली आहे.
१४ वर्ष संसार केल्यानंतर सेलिना आणि पीटर हाग यांच्या आयुष्यात वादळ आलं आहे. त्यानंतर सेलिना आता भारतात परतली आहे. सेलिना तिच्या आयुष्यात अनेक अडचणींना तोंड देत आहे. शिवाय तिचा भाऊ यूएईमध्ये नजरकैदेत आहे. अलिकडेच सेलिना जेटलीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये तिने म्हटलंय की,"ज्या दिवशी मी आपल्या आत्मसन्मानासाठी, भावासाठी आणि मुलांसाठी ऑस्ट्रिया सोडण्याचा निर्णय घेतला, त्याच दिवशी मी माझ्या मुलांनाही गमावलं. त्यानंतर माझ्या मुलांना मला भेटण्यापासून वारंवार रोखण्यात आलं. त्यांना धमक्या देऊन आणि भीती दाखवून माझ्याविरुद्ध बोलण्यास भाग पाडण्यात येतंय."
मग सेलिनाने लिहिलंय, "जे पुरुष आणि महिलांनी त्यांच्या वैवाहिक आयुष्यात खूप काही सहन केलं आहे.त्यांना मी हे सांगू इच्छिते की तुम्ही एकटे नाही आहात. ११ ऑक्टोबर, २०२५ च्या दिवशी मी माझ्या शेजाऱ्यांच्या मदतीने, मला होत असलेल्या छळ आणि अत्याचारापासून वाचण्यासाठी ऑस्ट्रिया सोडली. त्यानंतर,माझ्याकडे काहीच पैसै नव्हते, त्या परिस्थितीत मी भारतात परतले आणि मला जगण्यासाठी संघर्ष करावा लागला. भारतात, माझ्या स्वतःच्या घरात राहण्यासाठी मला मनाई होती. त्यासाठी मला न्यायालयात धाव घ्यावी लागली. मी २००४ मध्ये, माझ्या लग्नापूर्वी भारतात प्रॉपर्टी खरेदी केली होती. या मालमत्तेवर आता माझा पती त्याचा हक्क दाखवतो आहे. हे सगळं करण्यासाठी मला मोठं कर्जही घ्यावं लागलं होतं."
या पोस्टमध्ये अभिनेत्रीने तिच्या मुलांना भेटता येत नसल्याचं दु:ख देखील व्यक्त केलं आहे. ती म्हणते- "ऑस्ट्रियन कौटुंबिक न्यायालयाच्या आदेशानंतरही, मला माझ्या तीन मुलांशी कोणताही संपर्क साधू दिला जात नाही. यामुळे मी खूप दुखावले आहे.माझ्या मुलांशी माझा संपर्क साधण्याच्या प्रयत्न केला तर त्यात वारंवार अडथळे आणले जात आहेत. त्यांना अशा काही बातम्या दाखवल्या जात आहेत. तसंच त्यांना माझ्याविरुद्ध बोलण्यासाठी त्यांना भाग पाडलं जातं आहे. ज्यामुळे पालक आणि मुलांमधील संवादावर परिणाम होत आहे. इतकंच नाही, तर माझ्याविरुद्ध बोलण्यासाठी त्यांचे ब्रेनवॉशिंग केलं जात आहे आणि त्यांना धमक्या दिल्या जात आहेत. हे अशा आईच्या विरोधात घडतंय, जिने जन्मापासून त्यांची काळजी घेण्यापासून प्रत्येक गोष्ट जीवापाड जपली. त्यांच्या वडिलांच्या करिअरला पाठिंबा देण्यासाठी एका देशातून दुसऱ्या देशात प्रवास करत गेले. प्रत्येक गोष्ट मागे सारली."
दरम्यान, या पोस्टमध्ये सेलिनाने असाही खुलासा केलाय की, लग्नाच्या १५ व्या वाढदिवसानिमित्त मागवलेली भेटवस्तू पोस्ट ऑफिसमधून घेण्यासाठी जाण्याच्या बहाण्याने तिच्या पतीने घटस्फोटाची नोटीस दिली, जिथे तोच स्वत: तिला घेऊन गेला होता.