सुनील शेट्टीने 'या' कारणामुळे 'बॉर्डर'मध्ये काम करण्यास दिलेला नकार; किस्सा शेअर करत म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2025 10:36 IST2025-05-19T10:33:33+5:302025-05-19T10:36:10+5:30
...म्हणून सुनील शेट्टीने 'बॉर्डर' चित्रपटासाठी दिला होता नकार, त्यानेच सांगितलं कारण, म्हणाला...

सुनील शेट्टीने 'या' कारणामुळे 'बॉर्डर'मध्ये काम करण्यास दिलेला नकार; किस्सा शेअर करत म्हणाला...
Suniel Shetty: अभिनेता सुनील शेट्टी (Suniel Shetty) हा हिंदी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय आहे. ९० च्या दशकातील बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी तो एक होता. सुनील शेट्टीने त्याच्या आजवरच्या कारकरिर्दीत अनेक अॅक्शनपट तसेच कॉमेडी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 'बलवान', 'धडकन', 'मोहरा', 'कृष्णा', 'बॉर्डर' तसंच 'हेरा फेरी', असे बरेच सुपरहिट सिनेमे त्याने इंडस्ट्रीला दिले आहेत. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून हा अभिनेता प्रचंड चर्चेत आहे. 'केसरी वीर' या त्याच्या आगामी चित्रपटातून तो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. येत्या २३ मे ला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होत आहे. याचनिमित्ताने सुनील शेट्टीने दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्याने अनेक खुलासे केले आहेत.
अलिकडेच सुनील शेट्टीने 'रेडिओ नशा'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये 'बॉर्डर' चित्रपटासंदर्भात एक आश्चर्यकारक खुलासा केला आहे. 'सुरुवातीला आपण या चित्रपटात काम करण्यास नकार दिला होता', असं त्याने या मुलाखतीमध्ये सांगितलं. हाच किस्सा शेअर करताना सुनील शेट्टी म्हणाला, "पहिल्यांदा मी बॉर्डरमधील भूमिका नाकारली होती. कारण, मी ऐकलं होतं की जेपी दत्ता खूप कडक दिग्दर्शक होते. आणि जर ते नाराज झाले तर ते वाईट शब्दांचा वापर करायचे. त्याशिवाय मी स्वतः खूप रागीट होतो. जेव्हा जेपी दत्ता मला भेटायला आले तेव्हा मी त्यांना सांगितले की 'मी तुमच्याशी नंतर बोलेन. मग मी माझ्या सेक्रेटरीला सांगितले, 'मी हे करू शकणार नाही कारण जर मला ते काही उलटसूलट बोलले तर माझाही रागावर नियंत्रण राहणार नाही."
त्यानंतर अभिनेत्याने सांगितलं की, कशा पद्धतीने त्याला पुन्हा चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. याबद्दल सांगताना सुनील शेट्टी म्हणाला, "मला कोणाशीही संबंध बिघडवायला आवडत नाही, म्हणून मी विचार केला, आपण हे सगळं विसरून जावं. पण जेपीजी मला कास्ट करण्यासाठी इतके हट्ट धरुन बसले होते की त्यांनी भरत शाह यांच्याशी संपर्क साधला, जे माझ्या सासूबाईंना ओळखत होते. तर, माझ्या सासूबाईंमुळे हा चित्रपट माझ्याकडे परत आला. त्यानंतर त्यांनी मला समजावले आणि चित्रपट करण्यासाठी मतपरिवर्तन केलं. यानंतर जेपी दत्ता आणि मी चांगले मित्र बनलो. याशिवाय अडचणीच्या काळातही जेपी दत्ता यांनी कोणताही विचार न करता त्यांच्या अनेक चित्रपटांमध्ये कास्ट केलं आहे. असंही सुनील शेट्टीने मुलाखतीमध्ये सांगितलं.
दरम्यान, १९९७ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'बॉर्डर' या चित्रपटाचं जेपी दत्ता यांनी लेखन आणि दिग्दर्शन केलं होतं. हा चित्रपट १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धावर आधारित आहे. या चित्रपटात सनी देओल, जॅकी श्रॉफ, अक्षय खन्ना, सुदेश बेरी आणि पुनीत इस्सर यांच्याही भूमिका होत्या.