सोनू सूदचा दिलदारपणा! सोलापुरातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अभिनेता पुढे सरसावला, म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 11:23 IST2025-09-30T11:18:13+5:302025-09-30T11:23:32+5:30
सोलापुरातील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा मदतीचा हात, व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

सोनू सूदचा दिलदारपणा! सोलापुरातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अभिनेता पुढे सरसावला, म्हणाला...
Sonu Sood: बॉलिवूडमधील दानशूर आणि कायम गरजुंच्या मदतीला धावून जाणाऱ्या कलाकारांपैकी एक नाव म्हणजे सोनू सूद (Sonu Sood). हिंदी, तमिळ, तेलगू आणि कन्नड अशा विविध भाषांतील चित्रपटांमध्ये काम करणारा कलाविश्वातील तो एक यशस्वी अभिनेता आहे. मात्र, हा अभिनेता त्याच्या अभिनयापेक्षा समाजकार्यामुळे सर्वाधिक चर्चेत असतो. गेली अनेक वर्ष हा अभिनेता कलाविश्वात सक्रिय आहे. लॉकडाऊनच्या काळात अनेक गरजुंची मदत करणाऱ्या या नायकाने पुन्हा एकदा मदतीचा हात पुढे केला आहे. सोलापुरातील पूरग्रस्तांसाठी अभिनेत्याने महत्त्वाचं पाऊल उचललं आहे.
कोरोना काळात सोनू सूदने लाखो कामगारांना स्वखर्चाने त्यांच्या घरी सुखरुप पोहोचवलं होतं. त्याचबरोबर अलिकडेच पंजाबमधील पूरग्रस्तांचीही भेट घेत त्यांने मदतीचा हात पुढे केला होता. त्यानंतर आता हा अभिनेता सोलापुरकरांच्या मदतीसाठी पुढे आला आहे. नुकताच त्याने आपल्या अधिकृत फेसबुक अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांच्या अभिनेत्याचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. "Solapur We Are With You...@, असं कॅप्शन अभिनेत्याने या व्हिडीओला दिलं आहे.
याशिवाय अभिनेत्याचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्या व्हिडीओमध्ये अभिनेत्याने म्हटलंय, "नमस्कार,सोलापूरमध्ये सीना नदीमुळे जो पूर आला आहे, त्यामुळे खूप नुकसान झाले आहे. यासंदर्भात आमची टीम माहिती घेत आहे. गरजू कुटुंबांना आम्ही खाण्याचे आणि मेडिकल किट्स पोहचवण्याचे काम करत आहेत. "
त्यानंतर पुढे अभिनेत्याने म्हटलंय, "आमची चॅरिटी फाउंडेशनची टीम आणि इतर लोक या कार्यात आमच्यासोबत जोडले जात आहे. त्यांचे मी मनापासून आभार मानतो. मी त्यांना विनंती करतो की, या पुरामध्ये ज्या घरांचे, कुटुंबांचे नुकसान झाले आहे, त्यांची माहिती घ्या. आपण त्यांना एकत्र मिळून पुन्हा एकदा उभे राहण्यासाठी मदच करुया. "अशा भावना अभिनेत्याने व्यक्त केल्या आहेत.
वर्कफ्रंट
सोनू सूदच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर १९९९ मध्ये त्याने 'कल्लाझागर' या तमिळ चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. मात्र,त्याला खरी ओळख 'अरुंधती' या चित्रपटामुळे मिळाली. बॉलिवूडमध्ये सलमानच्या 'दबंग' चित्रपटात खलनायक साकारून त्याने आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनावर एक वेगळा ठसा उमटवला. अलिकडेच अभिनेता 'फतेह' या हिंदी सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.