सहाय्यक भूमिकेतून छाप उमटवली! क्रिकेट सामना बघता बघता मृत्यूनं घातला घाला, स्टारडमची आजही होते चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 16:57 IST2026-03-13T16:32:38+5:302026-03-13T16:57:35+5:30
शशी कपूर यांच्यासोबत डेब्यू,१४ वर्ष गाजवली इंडस्ट्री! भारत-श्रीलंका मॅच पाहताना हार्ट अटॅक आला अन्...

सहाय्यक भूमिकेतून छाप उमटवली! क्रिकेट सामना बघता बघता मृत्यूनं घातला घाला, स्टारडमची आजही होते चर्चा
Bollywood Actor: भारतीय चित्रपटसृष्टी असे अनेक कलावंत होऊन गेले. जे आपल्या अभिनयाने आजही प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहेत. या कलावंतांना विसरणं प्रेक्षकांना कदापि शक्य नाही. अशा कलावंतांपैकी एक नाव म्हणजे अभिनेते शफी इनामदार. नाट्य आणि चित्रपटांमध्ये चरित्र भूमिका साकारणारा अभिनेता, एक उत्कृष्ट कलावंत म्हणून त्यांचे नाव आदरपूर्वक घेतलं जातं. अभिनेते शफी इनामदार यांचा जन्म २३ ऑक्टोबर १९१५ रोजी महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात असलेल्या पांगरी, दापोली येथे झाला.आज त्यांचा स्मृतिदिवस आहे.यानिमित्ताने त्यांचा अभिनय प्रवास आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेऊया...
शफी इनामदार हे अभिनयासोबतच नाट्यलेखन, दिग्दर्शन, निर्माता, हास्यअभिनेता आणि चरित्र अभिनेता म्हणून ओळखले जायचे. रंगभूमीवरही त्यांचा दांडगा वावर होता.१९८२ मध्येच गोविंद निहलानी दिग्दर्शित शशी कपूर यांच्या 'विजेता' या चित्रपटातून त्यांनी अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं. त्यानंतर खऱ्या अर्थानं त्यांचा अभिनय प्रवास सुरु झाला.'नीला कमरा','नागमंडळ' सारखी नाटके तसेच 'ये जो है जिंदगी', 'तेरी भी चूप - मेरी भी चूप' या दूरचित्रवाणी मालिका, 'आज की आवाज', 'अवाम', 'नजराना', 'अनोखा रिश्ता', 'अमृत' यांसारखे अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं.शफी यांना त्यांच्या 'आज की आवाज'या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचं फिल्मफेअर पुरस्कार नामांकन मिळालं होतं.

नाना पाटेकर यांच्यासोबचा यशवंत हा त्यांचा कारकिर्दीतील शेवटचा सिनेमा होता. हा चित्रपट त्यांच्या मृत्यूनंतर प्रदर्शित झाला. त्यांची कारकीर्द दोन दशकांहून अधिक काळ चालली, असंख्य चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिकांतून एक अभिनेता म्हणून ते नावारुपाला आले.
भारत विरुद्ध श्रीलंका हा सामना पाहताना झाला मृत्यू...
वैयक्तिक आयुष्यात शफी इनामदार यांनी टी.व्ही.निवेदिका व अभिनेत्री भक्ती बर्वे यांच्याशी विवाह केला होता. १९९६ च्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील भारत विरुद्ध श्रीलंका हा ऐतिहासिक उपांत्य सामना पाहताना १३ मार्च १९९६ रोजी शफी इनामदार यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.