"त्यांच्या नात्यात कटूता नव्हती, पण...", लेक सुझैन आणि हृतिक रोशन यांच्या घटस्फोटाबद्दल संजय खान काय म्हणाले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 11:21 IST2026-01-10T11:16:31+5:302026-01-10T11:21:59+5:30
"त्यांच्या नात्यात कटूता नव्हती, पण...", वेगळे झालेल्या लेक सुझैन आणि हृतिक रोशन यांच्या घटस्फोटाबद्दल संजय खान यांचं वक्तव्य

"त्यांच्या नात्यात कटूता नव्हती, पण...", लेक सुझैन आणि हृतिक रोशन यांच्या घटस्फोटाबद्दल संजय खान काय म्हणाले?
Sanjay Khan On Hrithik-Sussane Divorce: बॉलिवूडचा ग्रीक गॉक अशी बिरुदावली मिरवणारा अभिनेता हृतिक रोशन हा इंडस्ट्रीतील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक आहे. आतापर्यंत हृतिकने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. कहों ना प्यार है, क्रिश तसेच वॉर यांसारख्या अॅक्शन चित्रपटांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या या अभिनेत्याचा आज वाढदिवस आहे. याचनिमित्ताने अभिनेत्याच्या पूर्वाश्रमीची पत्नी सुझैन खानचे वडील अभिनेते संजय खान यांनी खास पोस्ट लिहिल्याची पाहायला मिळतेय. या पोस्टमध्ये त्यांनी हृतिकचं भरभरुन कौतुकही केलंय. त्याचबरोबर लेक सुझैन आणि हृतिकच्या वेगळे होण्याच्या निर्णयावर देखील ते व्यक्त झाले आहेत.
सुझैन खान ही हृतिक रोशनची पहिली पत्नी आहे. काही वर्षांपूर्वीच त्यांचा घटस्फोट झाला आहे. मात्र, असं असूनही दोघांमध्ये अजूनही मैत्री टिकून आहे. याशिवाय दोन्ही कुटुंबांमध्ये चांगले नाते आहे. अशातच हृतिकच्या वाढदिवसाचं औचित्य साधून सुझैनचे वडील अभिनेते संजय खान यांनी पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलंय,"मी हृतिक रोशनला पहिल्यांदा भेटलो तेव्हा तो तरुण होता, जायेदने आमची ओळख करून दिली होती. त्यावेळी मला सकाळी सायकलिंगसाठी एका नवीन सायकलची गरज होती, आणि योगायोगाने मी त्याबद्दल जायेदशी बोललो.मग त्यानेच हसून उत्तर दिले, या बाबतीत सल्ला पाहिजे असले तर हृतिक हाच योग्य माणूस आहे. "
त्यानंतर पुढे या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलंय की," हृतिक शब्दाचा पक्का आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तो सकाळी आला आणि त्याने नवीन मॉडेल्सच्या सायकल्सची माहिती दिली,जसे की ट्रेंडी थ्री-स्पीड गिअर सिस्टीम.त्यांच्या बोलण्यात स्पष्टता होती, आणि तो खूप शांत आहे. आणि ज्या आत्मविश्वासाने बोलत होता, त्याने मला खूप प्रभावित केलं.पुढे हाच मुलगा एके दिवशी माझ्या मुलगी सुझानशी लग्न करून आमच्या कुटुंबाचा भाग बनेल, याबद्दल मी विचारही केला नव्हता."
'कहो ना... प्यार है' प्रदर्शित झाला आणि तो...
मग संजय खान यांनी लिहिलंय, "जेव्हा मी बेंगळुरूमध्ये माझं 'हिल्टन गोल्डन पाम्स' हॉटेल सुरु केलं, तेव्हा मी हृतिक आणि झरीन यांना तिथे आमंत्रित केलं होतं.याच काळात हृतिकचा पहिला 'कहो ना... प्यार है' प्रदर्शित झाला आणि तो रातोरात सुपरस्टार झाला. इतके प्रचंड यश मिळूनही हृतिकने कोणताही अहंकार नाही. तो खूप शिस्तप्रिय होता, सर्वांशी आदराने वागत असे आणि नेहमी काहीतरी नवीन शिकायला तयार असायचा.तो माझ्याशी अनेकदा चित्रपटांबद्दल बोलायचा आणि माझा सल्ला खूप लक्षपूर्वक ऐकायचा. हृतिकचे यश त्याच्या कठोर परिश्रमामुळे आणि कामाप्रती असलेल्या समर्पणामुळे आहे. आज तो बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे, पण आजही त्याची शिकण्याची वृत्ती कायम आहे.
सुझैन आणि हृतिकच्या घटस्फोटाबद्दल काय म्हणाले?
"हृतिक आणि सुझैन आज एकत्र नसले तरी, मला आजोबा होण्याचा हा आनंद सुझैनमुळे मिळाला. माझी रिहान आणि हृदान हे दोन गोड नातवंड आहेत. ज्यांचं संगोपन तिने उत्तम पद्धतीने केलं आहे. एकमेकांच्या भावनांचा आदर करत विचारपूर्वक त्यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला, त्यांच्या नात्यात कुठलीही कटुता नव्हती. आजही मी माझ्या मित्रांना गंमतीने सांगतो की, तिने हृतिकला 'दोन एक्के' दिले आहेत."
दरम्यान, हृतिक रोशन आणि सुझैन खान हे कपल बॉलिवूडमधील प्रसिद्ध जोडप्यांमध्ये गणलं जायचं. परंतु काही मतभेदांमुळे हृतिक- सुझैन यांनी घटस्फोट घेतला आणि आपल्या नात्याला पूर्णविराम दिला. हे दोघे जरी विभक्त झाले असले तरी त्यांच्या मुलांच्या योग्य संगोपनासाठी ते सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसतात.