संजय दत्त काय ऐकत नाय! 'धुरंधर २'नंतर अभिनेत्याला मिळाला मोठा प्रोजेक्ट, पहिली झलक समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 15:49 IST2026-04-02T15:46:05+5:302026-04-02T15:49:25+5:30
'धुरंधर २'नंतर संजय दत्तची नवी भूमिका! ‘आखिरी सवाल’ मधून प्रेक्षकांच्या येणार भेटीला, पहिली झलक पाहिलीत?

संजय दत्त काय ऐकत नाय! 'धुरंधर २'नंतर अभिनेत्याला मिळाला मोठा प्रोजेक्ट, पहिली झलक समोर
Aakhri Sawal Movie : बॉलिवूड अभिनेता संजय दत्त सध्या 'धुरंधर २' या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. या चित्रपटाने संपूर्ण जगभरातील सिनेरसिकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या चित्रपटात त्याने साकारलेल्या चौधरी असलमचं सगळीकडे कौतुक होताना दिसतंय. एकीकडे 'धुरंधर-२' ची चर्चा असताना संजय दत्त आता नव्या भूमिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाला आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट दिग्दर्शक अभिजीत मोहन वारंग यांच्या दिग्दर्शनात तयार झालेल्या ‘आखरी सवाल’ची झलक प्रदर्शित झाली आहे. यात संजय दत्त मुख्य भूमिकेत असून निर्मिती निखिल नंदा यांनी केली आहे.
महात्मा गांधी यांच्या निधनानंतर लावण्यात आलेल्या बंदीपासून ते बाबरी मशीद पाडल्याच्या आरोपांपर्यंत, ‘आखरी सवाल’ असे गंभीर प्रश्न उपस्थित करते ज्यांची उत्तरे लोक दीर्घकाळ शोधत आहेत. धाडसी आणि स्पष्ट मांडणी करणारी ही झलक इतिहासाच्या खोलात उतरते आणि संपूर्ण देशात नवी चर्चा निर्माण करणारी कथा मांडते.
कलाकार...
अभिनेता संजय दत्तसह अमित साध, नमाशी चक्रवर्ती, समीरा रेड्डी, नीतू चंद्रा आणि त्रिधा चौधरी यांसारख्या कलाकारांनी सजलेला ‘आखरी सवाल’ हा प्रेक्षकांच्या उत्सुकतेचा विषय ठरला आहे. निर्मात्यांनी हनुमान जन्मोत्सवाच्या शुभमुहूर्तावर (२ एप्रिल, सकाळी ११:११ वाजता) ही झलक प्रदर्शित केली असून ती सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. ही बहुप्रतीक्षित झलक चित्रपटाच्या विषयाची प्रभावी झलक दाखवते. देशाला पाहण्याची गरज असलेल्या दडलेल्या कथांच्या स्तरांना उलगडण्याचा प्रयत्न यात दिसतो. थेट आणि संवादात्मक शैलीतील ही झलक चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर आणखी मोठी चर्चा निर्माण होईल अशी अपेक्षा आहे.
असं आहे कथानक...
कथा विक्कीची आहे, जो हुशार पण थोडा तापट स्वभावाचा संशोधक आहे आणि प्रगत भारताचे स्वप्न पाहणारा महत्वाकांक्षी तरुण आहे. त्याचा संशोधन प्रबंध नाकारल्यानंतर तो आपल्या मार्गदर्शक प्राध्यापक गोपाल नडकर्णी यांच्यावर पक्षपातीपणाचा आरोप करतो. सुरुवातीला शैक्षणिक वाद असलेला हा विषय पुढे राष्ट्रीय दूरचित्रवाणीवरील चर्चेत बदलतो. चित्रपट भारतातील तरुणांच्या मनात निर्माण होणारे प्रश्न, त्यांची आशा, शंका आणि इतिहासातील घटनांमधून सत्य शोधण्याची धडपड दाखवतो. चित्रपटाच्या केंद्रस्थानी गुरु-शिष्यांमधील तीव्र संघर्ष आहे. विक्कीची सततची विचारणा एका खोल वैयक्तिक हेतूचा उलगडा करते. अखेरीस त्याचा ‘आखरी सवाल’ शतकभर जुन्या गुपितावर प्रकाश टाकतो, जे प्राध्यापकांना योग्य ठरवू शकते किंवा दोघांचेही आयुष्य उद्ध्वस्त करू शकते.
अभिजीत मोहन वारंग यांनी २०२१ मध्ये ‘पिकासो’ या मराठी नाट्यप्रधान चित्रपटातून दिग्दर्शनाची सुरुवात केली होती. त्यांना ६७व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांत विशेष उल्लेख मिळाला होता. त्यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत ‘डेजा वू’, ‘प्रेम प्रथा धूमशान’, ‘पिकोलो’ आणि ‘वर्चुअल रियलिटी’ यांसारखी कामे केली आहेत. ‘निखिल नंदा मोशन पिक्चर्स’च्या बॅनरखाली तयार झालेला हा चित्रपट निखिल नंदा सादर करत आहेत. ‘आखरी सवाल’चे निर्माते निखिल नंदा आणि संजय दत्त असून पुनीत नंदा, डॉ. दीपक सिंह, गौरव दुबे आणि उज्ज्वल आनंद सहनिर्माते आहेत.
चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद उत्कर्ष नैथानी यांनी लिहिले आहेत. संगीत मोंटी शर्मा यांनी दिले असून गीतलेखन कुमार विश्वास यांनी केले आहे.
‘आखिरी सवाल’ ८ मे २०२६ रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.